Video : नांदेड महापालिकेचे आयुक्त काय म्हणाले वाचा...

अभय कुळकजाईकर
Tuesday, 28 April 2020

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. 

नांदेड - नांदेड शहरात आत्तापर्यंत कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी पिरबुऱ्हाणनगरच्या एका रुग्णाचा वैद्यकीय उपचारानंतर अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. तरी देखील त्या रुग्णास रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी देखील घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. 

नांदेड वाघाळा महापालिका हद्दीत अबचलनगर या क्षेत्रात कोव्हीड - १९ चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नियमानुसार अबचलनगर व परिसर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कंटेनमेंट झोन (अटकाव) म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच तेथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत. या आधी पिरबुऱ्हाणनगर हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 

हेही वाचा -  कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात आता टास्क फोर्स

कंटेनमेट झोनमध्ये महापालिकेकडून घरपोच सेवा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार अनुज्ञेय असलेल्या सर्व आवश्यक त्या सेवा या भागात बंद करण्यात येत आहेत. या सेवा महापालिकेकडून घरपोच देण्यात येतील. त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक अधिकारी म्हणून प्रकाश गच्चे, सुपरवायझर आणि त्यांच्या अधिनस्त वसुली लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडसंहितानुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल. तक्रार असल्यास नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दीन, बळीराम भुरके, सुग्रीव अंधारे, प्रकाश गच्चे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.

हेही वाचलेच पाहिजे - लॉकडाउन : मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, कशासाठी? ते वाचाच

अबचलनगरमध्ये तपासणी पथक
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अबचलनगर आणि पिरबुऱ्हाणनगर भागात हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर उपायुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, सहायक आयुक्त गुलाम सादेक, डॉ. मिर्झा बेग आदी अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. आरोग्य विभागातर्फे पिरबुऱ्हाणनगर येथे आज सातव्या दिवशी तसेच अबचलनगर येथे दुसऱ्या दिवशी तपासणी पथकाद्वारे थर्मल मशीनने तपासणी करण्यात आली. 

येथे क्लिक कराच - गर्दी टाळण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत करा नोंदणी

निर्देशाचे पालन करावे

जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा आणि अत्‍यंत आवश्‍यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, नांदेड वाघाळा महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read what the Nanded Municipal Commissioner said ..., Nanded news