whatsap
whatsap

कारवाईच्या भीतीने व्हॉट्सॲप ग्रुप झाले शांत

सेनगाव (जि. हिंगोली) : व्हॉट्सॲप हे सोशल मीडियातील माहिती आदानप्रदान करण्याचे अलीकडच्या काळात प्रभावी माध्यम ठरत आहे. कोरोना संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट पाठविणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बहुतांश ग्रुप ॲडमीननी केवळ आपली पोस्ट शेअर करता येईल, अशी सेटिंग व्हॉट्सॲपमध्ये केली आहे. यामुळे ग्रुप वरील संदेश येण्याचे प्रमाण घटले आहे.

देशात कोरोना विषाणुजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा, यासाठी संचारबंदी लागू आहे. पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व महसूल प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यावर भर दिल्या जात आहेत. प्रत्येक घरात ॲन्ड्रॉइड मोबाइल पोचला आहे.

तालुक्यात अनेक व्हॉट्सॲप ग्रुप

 हे मोबाइलधारक विविध गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत असणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सदस्य आहेत. काही नागरिक आपल्याकडे आलेल्या पोस्टची कोणतीही शहानिशा न करता व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड करत असल्याचे चित्र आहे. सेनगाव तालुक्यात अनेक व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी सदस्य म्हणून आहेत.

सायबर शाखा नजर ठेवून

 कोरोनासंदर्भात आक्षेपार्ह संदेश, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त व समाज विघातक संदेश, व्हिडिओ टाकणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. जिल्हा पोलिस सायबर शाखा सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. 

केवळ एडमिनच पोस्ट शेअर करू शकेल

लाॅकडाउन काळात वादग्रस्त पोस्ट सदस्याकडून चुकूनही शेअर होऊ नये, यासाठी यामुळे व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमीनकडून सदस्यांना आवाहन केले जात आहे. याची खबरदारी घेण्यासाठी ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करून केवळ एडमिनच पोस्ट शेअर करू शकेल, अशी व्यवस्था केली जात आहे. यामुळे अनेक ग्रुप शांत झाले आहेत.


कायदेशीर कारवाई

कोरोना संदर्भात कोणीही तोंडी, सांगो-वांगी अथवा व्हॉट्सॲप व फेसबुकसारख्या सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरवून नये. अफवा पसरविल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
-सरदारसिंग ठाकूर, पोलिस निरीक्षक

आता ‘व्हीआरआरटी’ पथकात शिक्षकांचा समावेश

हिंगोली : मोठ्या शहरात कामानिमित्त गेलेले ग्रामस्थ आता गावाकडे आले आहेत. आशा स्‍थलांतरीत लोकांचा शोध घेण्यासाठी गावपातळीवर ग्रामशीघ्र प्रतिसाद पथक (व्हीआरआरटी) स्‍थापन करण्यात आले असून यात आता शिक्षकांचादेखील समावेश करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता. सहा) शिक्षण विभागास दिले आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाउन यासह सीमाबंदीदेखील करण्यात आली आहे. कामानिमित मोठ्या शहरात गेलेले गावकरी परत आले आहेत. अशा स्‍थलांतरीत नागरिकांचा शोध घेण्यासाठी गावपातळीवर ग्रामशीघ्र प्रतिसाद पथक (व्हीआरआरटी) तयार करण्यात आले आहे. 

शिक्षकांची होणार नियुक्‍ती

या पथकात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिस पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा स्‍वंयसेविका यांचा समावेश करण्यात आला होता. आता यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाप्रमाणे जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात येत आहे. सदर व्हीआरआरटी पथकामार्फत गावपातळीवर सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळून आल्यास रुग्णास संदर्भित करणे, कोरोनाबाबत गावात जनजागृती करणे, अशी कामे या पथकातर्फे केली जाणार आहेत. 

शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

या बाबतचे पत्र शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांस तत्‍काळ व्हीआरआरटी पथकात रुजू होण्याबाबत आदेशीत करावे लागणार आहे. या कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास साथरोग नियंत्रण कायदा व आपती व्यवस्‍थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात देण्यात आला आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com