esakal | शासकीय कापुस खरेदी केंद्र कधी होणार सुरू? शेतकऱ्यांना प्रतिक्षा, खासगी व्यापाऱ्यांकडून लूट
sakal

बोलून बातमी शोधा

1kapus_9

माजलगाव तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कपाशीचे चांगले उत्पादन आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतातच कपाशीच्या वाती झाल्या.

शासकीय कापुस खरेदी केंद्र कधी होणार सुरू? शेतकऱ्यांना प्रतिक्षा, खासगी व्यापाऱ्यांकडून लूट

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव(जि.बीड) : तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कपाशीचे चांगले उत्पादन आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतातच कपाशीच्या वाती झाल्या. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कापूस जोपासला. मात्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने केवळ साडेचार हजार रूपये क्विंटलने खासगीत व्यापारी कापसाची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.तालुक्यात यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती.

मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार

मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसामुळे कापूस ही जोमात आला होता. यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषधी व फवारणी करत मशागत केली होती. परतीच्या झालेल्या जोरदार पावसामुळे आलेले कापसाचे बोंड शेतातच सडत होते, तर फुटलेल्या कापसाच्या जागेवरच वाती होत होत्या. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कसे-बसे कापुस वेचुन घरात आणला आहे.

सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापुस आहे. त्यांना आता शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतिक्षा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या पैशांची चणचण असल्याने निघालेला कापूस शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे विक्री करत असल्याने व्यापारी कवडीमोल दराने या कपाशीची खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ७०० ते १२०० रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

संघर्ष अन् राजकारण ऊसतोड मजुरांच्या फडात, भाजपात

अशी होणार शासकीय खरेदी
सातबारा, पिकपेरा, आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या पासबुकाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आधार लिंक असलेला, एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर क्रमांकानुसार कापसाची खरेदी होणार आहे.

खरेदी सुरू करावी
या वर्षीच्या हंगामात वेळेवर पाऊस आल्याने कपाशीचे पिक जोमात होते. परंतु आॅक्टोबर महिन्यात पडलेल्या परतीच्या दमदार पावसाने या पिकाचे आतोनात नुकसान झाले आणि कसेबसे निघालेली कपाशीला व्यापारी कवडीमोल दराने शेतकऱ्यांकडुन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व लुट होत आहे. त्यामुळे ही लुट थांबविण्यासाठी शासनाने तात्काळ शासकीय कापुस खरेदी सुरू करावी, अशी मागणी तहसिलदार वैशाली पाटील यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रमेश जोगडे, गोविंद देशमाने, गणेश वाघमारे यांनी केली आहे.


शासकीय कापूस खरेदीसाठी बाजार समितीमध्ये नोंदणी सुरू आहे. कापसाला २० ते २२ मायश्‍चर येत आहे. त्यामुळे साडेचार ते ४९०० रूपयांपर्यंत खासगी बाजारपेठेत भाव मिळत आहे. दहा ते बारा मॉयश्‍चर आल्यास शेतकऱ्यांना शासकीय कापुस खरेदी केंद्रावर ५२०० ते ५८०० रूपयांपर्यंतचा भाव मिळेल. अडचण आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा.
एच. एन. सवणे, सचिव, बाजार समिती, माजलगाव


संपादन - गणेश पिटेकर