‘या’ शहरात कधी होणार अनधिकृत बांधकामावर कारवाई?

अभय कुळकजाईकर
रविवार, 19 जानेवारी 2020

नांदेड शहर आणि परिसरातील ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. मात्र, त्यातील अनेक बांधकामे अनधिकृत आणि विनापरवानगी असल्यामुळे त्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे. भविष्यात समस्या उद्‍भवू शकतात त्यामुळे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

नांदेड ः नांदेड शहरासह आजूबाजूच्या ग्रामपंतायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. मात्र, त्यातील अनेक बांधकामे ही विनापरवानगी आणि अनधिकृत असून त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अनाधिकृत बांधकामावर वेळीच कारवाई करणे आवश्‍यक असून त्या दृष्टीने प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात मोठ्या समस्या उद्‍भवण्याच्या चिन्हे आहेत.

नांदेड महापालिकेसह शहराला लागून असलेल्या वाडी, विष्णुपुरी, बळीरामपूर आदी ग्रामपंचायती आहेत. सध्या नांदेडमध्ये वास्तव्यास येणाऱ्यांचा लोंढा वाढत चालला असल्यामुळे शहरालगत आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. त्यात अपार्टमेंट, संकुले, रो हाऊस, बंगलो आदींचा समावेश आहे. मात्र, त्यातील बहुतांश बांधकामे ही अनाधिकृत, विनापरवानगी आणि मंजूर नकाशाविरुद्ध आहेत. त्याचबरोबर प्लॉट, फ्लॅट विक्री करणारे तसेच बांधकामाशी संबंधित असणाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा....कलावंतांसाठी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा

अनाधिकृत बांधकामांना नोटीसा
नांदेड महापालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने दरवर्षी अशी बांधकामे शोधून त्यांना नोटीसा बजाविण्यात येतात. गेल्या वर्षी जवळपास ३२५ अनाधिकृत बांधकामांना महापालिकेने नोटिसा दिल्या होत्या. मात्र, पुढे कार्यवाही काय झाली, याची माहिती मिळत नाही. ग्रामपंचायतीमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर तत्काळ कारवाई करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. विशेष करुन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्येही फारसे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे त्या ठिकाणीही ‘एफएसआय’चे सर्रास उल्लंघन होत आहे. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अनधिकृत बांधकामाची शास्तीही व्हावी वसूल
शासनाने केलेल्या तरतूदीनुसार ता. चार जानेवारी २००८ च्या नंतरच्या बांधकामांना अनधिकृत शास्ती लागते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने नांदेडमधील चार हजार ८४० मालमत्ताधारकांना अनधिकृत बांधकाम शास्ती लावण्यात आली आहे. त्याची थकबाकी १४ कोटी ४८ लाख रुपये असून चालू वर्षाची मागणी चार कोटी ८० लाख रुपये आहे. अशी एकूण १९ कोटी २८ लाख रुपये येणे असून त्यापैकी तीन कोटी ३२ लाख रुपये आत्तापर्यत वसुली झाली आहे. उर्वरित वसुली ३१ मार्चपूर्वी करायची असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा... नांदेडला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी चुरस

नांदेडला ३२५ बांधकामे अनधिकृत
महापालिका हद्दीत २०१९ - २० मध्ये ३२५ बांधकामे अनधिकृत झाली असून त्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाप्रमाणे ५३ आणि ५४ ची नोटीस संबंधितांना बजाविण्यात आली आहे. आता संबंधितांविरुद्ध २६० ची नोटीस बजाविण्यात येणार असून त्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढले नाही तर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- विलास भोसीकर, उपायुक्त.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will unauthorized construction be initiated in this city?