सेनगावकर का पडताहेत घराबाहेर ?

जगन्नाथ पुरी
शनिवार, 23 मे 2020

कडाक्याच्या उन्हामुळे उकाडा वाढला असून या स्थितीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. या प्रकारामुळे कंटाळलेले काही नागरिक गल्लोगल्ली फिरत असल्याचे चित्र आहे. यातून कोरोनाचा धोका वाढला आहे.

सेनगाव (जि. हिंगोली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे घरात सुरक्षीत राहणे योग्य आहे. मात्र कडाक्याच्या उन्हामुळे उकाडा वाढला असून या स्थितीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे सेनगाव शहरातील नागरिक घराबाहेर पडत असून या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

दोन महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विनाकारण घराच्या बाहेर नागरिकांनी फिरू नये, असे आवाहन केले जात आहे. प्रारंभी काळात नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केले. 

हेही वाचामुंबईवाल्यांनी वाढविला घोर, पुन्हा आले सहा पाॅझिटिव्ह

वारंवार विद्युत पुरवठा खंडित

अनेक सुज्ञ नागरिकांनी घरीच सुरक्षीत राहण्यास पसंती दिली. दिवसभर वीजपुरवठा सुरळीत राहत असल्याने घरी थांबणाऱ्या नागरिकांचा सहज वेळ निघून जात होता. मात्र मागील काही दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. 

स्थलांतरीत झालेले परतताहेत गावाकडे

या भागातील अनेक नागरिक रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह परराज्यात स्थलांतरित झाले आहेत. लॉकडाउनमुळे अडकलेले नागरिक आता मोठ्या प्रमाणात गावी परत येत आहेत. कोरोना हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना लागणची संभाव्य दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

उन्हाचा पारा वाढला

 परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेऊन क्‍वारंटाइन केले जात आहे. मात्र, काही दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने होणाऱ्या उकाड्यामुळे नागरिकांना घरात राहणे अवघड बनले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा धोका वाढला

 दिवसातून अनेकदा वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे कंटाळलेले काही नागरिक गल्लोगल्ली फिरत असल्याचे चित्र आहे. खंडित विद्युत पुरवठ्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा धोका वाढला आहे. नागरिकातून संतापाची लाट पसरत आहे.

येथे क्लिक कराहिंगोली बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार सुरू

 

विद्युत पुरवठा सुरळीत होईल

सेनगाव शहरात तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा अचानक खंडित होत आहे. येत्या दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत होईल.
-श्री. वडगावकर, कनिष्ठ अभियंता

वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे 

काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात वारंवार वीज प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे उकाडा जाणवत आहे. या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. याची दखल वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
-संदेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why are Sengaonkars falling out of the house? Hingoli news