Vidhan Sabha 2019 : का झाली होती हर्षवर्धन जाधव यांना मारहाण?

Harshvardhan-Jadhav
Harshvardhan-Jadhav

औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव म्हटले की, वाद आणि वादग्रस्त वक्तव्य असंच काहीसंसध्या समीकरण झाले आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून विजयी झाल्यानंतर 2011 मध्ये हर्षवर्धन खऱ्या अर्थाने राज्यभर चर्चेत आले.

5 जानेवारी 2011 रोजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर वादावादी होऊन हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. मारहाणीनंतर त्यांना चालतासुद्धा येत नव्हते. यानंतर याचे पडसाद राज्यभरात आणि विधिमंडळात ही उमटले होते. 

त्यानंतर राज ठाकरेंवर आरोप करत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला, पण स्थानिक नेत्यांशी त्यांचे सातत्याने खटके उडाले. जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नी पराभूत झाल्यानंतर त्यात अधिकच वाढ झाली आणि लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंडखोरी केली. एवढ्यावरच न थांबता शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत त्यांनी स्वतःचा पक्षही काढला.

दरम्यान, मराठा आरक्षणात उडी घेत त्यांनी शिवसेना कशी आरक्षणाच्या विरोधात आहे आणि आपल्या मंत्र्यांचे धमक्‍यांचे फोन आले हे सांगत खळबळ उडवून दिली होती. लोकसभा निवडणुकीनंतर एमआयएम आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यांशी देखील जाधव यांनी पंगा घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत माफी मागा, नाहीतर एमआयएमची कार्यालये फोडू, अशी धमकी जाधव यांनी दिली होती. अशा अनेक कारनाम्यांनी जाधव सतत चर्चेत राहिले. 

का झाली होती मारहाण?

5 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वेरूळ लेणीचा दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यावेळेस मनसेमध्ये असलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी पुढे आलेल्या सूर्यकांत कोकणे या पोलिस अधिकाऱ्यावरही त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलिस आणि आमदार जाधव यांच्यात जोरदार वाद झाला.

त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याने पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली होती. 
मारहाण झाल्यानंतर घटनास्थळावरून अक्षरशः उचलून त्यांना रुग्णालयात न्यावे लागले होते. त्याचे राजकीय पटलावर चांगलेच पडसाद उमटले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने जाधव समर्थक केवळ पोलिसांवरच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसवरही संतापले होते. विशेष म्हणजे या मारहाणीनंतर भाजपसह शिवसेनेने आक्रमकपणे जाधव यांची पाठराखण केली होती. 

राज्यभर पडसाद अन्‌ खातेनिहाय चौकशी 

राज्यभर या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. हर्षवर्धन जाधव यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आणि या प्रकरणातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी ही आमदार जाधव यांची विचारपूस केली होती. आमदार जाधव यांचे वडील रायभान जाधव यांनी काँग्रेस आमदार म्हणून प्रदीर्घ काळ विधिमंडळ गाजविलेले होते. हर्षवर्धन यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनीही आमदारपद भूषविलेले आहे. मोठे राजकीय वजन असतानाही हर्षधर्वन जाधव यांना मारहाण झाली होती. हर्षधर्वन जाधव यांचे सासरे रावसाहेब दानवे त्यावेळी खासदार होते. 

राज ठाकरे यांनी घेतली होती सभा 

हर्षधर्वन जाधव यांना मारहाण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी 12 जानेवारी 2011 रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेऊन आपल्या खास स्टाईलमध्ये पोलिसांचा समाचार घेतला होता. दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी जोरदारपणे केली; परंतु पोलिसांविषयीही ते चांगले बोलले आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी पोलिस यंत्रणेशी संघर्ष टाळण्यास सांगितले होते.

त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना लक्ष्य केलेले होते. आबा आणि दादा यांना उद्देशून 'सत्या'मधील डायलॉग राज ठाकरे यांनी मारला होता. 'मौका सभी को मिलता है,' आमची वेळ आल्यावर दाखवून देऊ, असे ते म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com