बीडमध्ये विधवांची मकरसंक्रांत, पती निधनानंतर शिक्षिकेने उचलले हे पाऊल 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

पतीने प्रेमाने लावलेले कुंकू, घातलेले मंगळसूत्र अन्‌ पायातील जोडवे आदी आभूषणे उतरवली जात असल्याची प्रथा पाहून विधवा असलेल्या शिक्षिका मनीषा जायभाये यांना अस्वस्थ व्हायचे. महिलेला सतत अग्निडाग देणारी ही प्रथा असल्याच्या भावनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. 

बीड - मकरसंक्रांत म्हणजे सुवासिनींचा सण. या सणात हळदी-कुंकवाला तेवढेच महत्त्व आहे. सणानिमित्त सुवासिनी एकत्र येऊन हळदी-कुंकवाने सुरवात करूनच वाण लुटतात; परंतु विविध कारणांनी वैधव्य आलेल्या महिलांना संक्रांतीला धुमसत बसण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, बीडजवळ विधवांचीही संक्रांत साजरी झाली आहे. विधवा सहशिक्षकेच्या पुढाकाराने हा सण साजरा झाला. 

पालवण येथे 105 विधवांना संक्रांती सणानिमित्त मंगळवारी (ता. 14) साडी-चोळी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षिका असलेल्या मनीषा जायभाये यांनाही पतीच्या अपघाती निधनामुळे वैधव्य आले.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

महिलांच्या सणावारांत इतर महिला उत्साहात असायच्या आणि मनीषा जायभाये मात्र अधिकच दु:खी असायच्या. पण, सुवासिनींची सण साजरे करावेत आणि विधवांनी फक्त दुःखात पाहायचे का, या भावनेतून त्यांनी तीन वर्षांपासून विधवांसाठीही संक्रांत सुरू केली. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

पतीने प्रेमाने लावलेले कुंकू, घातलेले मंगळसूत्र, पायातील जोडवे आदी आभूषणे उतरवली जातात. ही प्रथा त्या महिलेला सतत अग्निडाग देणारी असल्याच्या भावनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. या बदलासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा महिलांना साडीचोळी देऊन तिचा सन्मान करण्याचा प्रयत्न त्या तीन वर्षांपासून करत आहेत. या उपक्रमाला समाज मान्यता मिळावी, अशीही त्यांची अपेक्षा आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

दरम्यान, पालवण येथे 105 विधवा महिलांना मंगळवारी साडी-चोळी भेट देण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा क्षीरसागर, जयश्री विधाते, सत्यभामा बांगर, मंगेश लोळगे, अंबादास इंगळे, अर्जून सुसे, सपना सुसे, डॉ. नेहरकर, किरण कानडे, दादासाहेब शेळके, दीपक नरवडे, आश्रुबा खेडकर, केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती लाहोर, निर्मळ अंकुश, वैभव स्वामी डॉ. नीलेश डुमणे, श्री. गरकळ, श्री. भुरे, अजिंक्‍य कदम, डी. एन. सावंत, संतोष ससाने, प्रतीक जायभाये उपस्थित होते. दरम्यान, पाहुण्यांना कुंकवाच्या रंगाचे गुलाब झाड भेट देऊन सत्कार करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Widow's Celebration At Beed