गीतांजलीच्या चारित्र्यावर शरदला संशय होता, मग कपाशीच्या पऱ्हाट्यावरच... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हिवरा या गावात शरद उर्फ दत्तू नामदेव लगड हा पत्नी गीतांजलीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. यावरून तो गीतांजलीला नेहमी मारहाणही करायचा. यातूनच ही क्रूर घटना घडली. 

बीड - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी मंगळवारी (ता. तीन) हा निकाल सुनावला. शरद उर्फ दत्तू नामदेव लगड (रा. हिवरा, ता. आष्टी) असे आरोपीचे नाव आहे. 

हिवरा (ता. आष्टी) येथील शरद उर्फ दत्तू नामदेव लगड हा पत्नी गीतांजलीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. यावरून तो गीतांजलीला नेहमी मारहाणही करायचा. दरम्यान, २९ डिसेंबर २०१७ ला शरदने गीतांजलीचा शेतात खून करून कापसाच्या पऱ्हाट्यावर तिचा मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - बापरे...फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले

या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक मिर्झा बेग व श्री. बारवकर यांनी तपास करून येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले.

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

साक्षी पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी शरद उर्फ दत्तू नामदेव लगड यास पत्नीच्या खुनास दोषी ठरवत त्यास जन्मठेप आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून अनिल तिडके यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून भीमराव बोंबाळे यांनी काम पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's murder in Beed district