राज्यातील धर्मादाय संस्थांना आता पुरस्कार : शिवकुमार डिगे

हरी तुगावकर
शुक्रवार, 22 जून 2018

धर्मादाय कार्यालय आता सरकारी कार्यालय राहिले नाही ते समाजाभिमूख झाले आहे. सामूहिक विवाह सोहळा उपक्रमाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या पुढेही गरीब मुलीच्या पित्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. सामूहिक विवाह सोहळे दरवर्षी घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर : राज्यातील वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करणाऱय़ा चार धर्मादाय संस्थांची निवड करून त्यांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी येथे केली. तसेच धर्मादाय संस्थांच्या निधीतून राज्यातील गरीब गुणवंत
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लातूर जिल्हा धर्मादाय संस्था सामूहिक विवाह समितीची आढावा बैठक डिगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. धर्मादाय कार्यालय आता सरकारी कार्यालय राहिले नाही ते समाजाभिमूख झाले आहे. सामूहिक विवाह सोहळा उपक्रमाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या पुढेही गरीब मुलीच्या पित्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. सामूहिक विवाह सोहळे दरवर्षी घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या वर्षीपासून राज्यात चांगले काम करणाऱया वैद्यकीय, शिक्षण, धार्मिक व सामाजिक धर्मादाय संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थांनी चांगले काम करावे कोणाला पैसे देण्याची गरज नाही. धर्मादाय कार्यालयातील
कर्मचाऱयांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. झिरोपेंडन्सी उपक्रम हाती घेतला आहे. वादात असलेल्या संस्थांची प्रकरणेही लवकरच निकाली काढली जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

काही दिवसापूर्वीच दहावी बारावीचे निकाल लागले आहेत. गरीब मुलांनी देखील टक्केवारी चांगली घेतली आहे. पण पैसे नसल्याने शिक्षणपासून वंचित राहतात की काय अशी अनेकांची परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन मुंबईत गणेश मंडळांची
बैठक घेतली. त्यात हा विषय़ मांडला. प्रत्येक जिल्ह्यातील दहा गुणवंत गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही मंडळे घेणार असल्याची माहितीही डिगे यांनी यावेळी दिली.

Web Title: Will Award for charitable organizations in the state says Shivkumar Dige