आधी पंकजा मुंडेंनी खेळले डावपेच, आता धनंजय मुंडेंची बारी...

दत्ता देशमुख
बुधवार, 1 जानेवारी 2020

बीड जिल्ह्यात राज्यातील सत्ता, मंत्रिपद, खासदार बहीण व पाच आमदारांच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सत्ताकारणात बाजी मारी. मात्र, आता बाजी पलटली असून, धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याची सत्तासूत्रे आली आहेत. आता जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे.

बीड - जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणे बहुतेकवेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रिपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच यशस्वी झाले आणि जिल्हा परिषद सत्तेपासून राष्ट्रवादी दूर फेकली गेली होती.

आता राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद भेटले आहे. त्यामुळे मागच्या प्रमाणे सत्तेचे गणित जुळविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का? हे पाहावे लागणार आहे. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. 

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत होते. पंकजा मुंडे स्वत: पालकमंत्री, त्यांच्यासह जिल्ह्यात पाच आमदार, केंद्रात सत्ता आणि भगिनी खासदार अशी भाजपची ताकद असताना निवडणुकीत मात्र भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या होत्या; परंतु सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी खेळलेले डावपेच यशस्वी झाले. त्यावेळी त्यांचे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी मेटेंच्या चार सदस्यांची साथ मिळविली, तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच सदस्यांची साथ मिळविली. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

शिवसेनेचे चार आणि कॉंग्रेस एक अशी सदस्य संख्या जुळवत त्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती. एकूणच राज्यातली सत्ता आणि मंत्रिपद या दोन जमेच्या बाजूंमुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले होते. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

आता पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी असून धनंजय मुंडे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपला मतदान करणाऱ्या सुरेश धस गटाच्या चार सदस्यांना आजघडीला मताचा अधिकार नाही. या सर्व राष्ट्रवादीसाठी जमेच्या बाजू आहेत. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

ज्या जमेच्या बाजूने भाजपने सत्ता मिळविली होती त्या आता राष्ट्रवादीकडे आहेत. आता धनंजय मुंडे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार का, हे पाहावे लागणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will The Nationalist Get Power In The Zilla Parishad?