समाजमन ओळखून कामकाज करणार ; मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे 

गणेश पांडे 
Wednesday, 9 December 2020

परभणी जिल्हा परिषद सभागृहामध्ये मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा निरोप समारंभ व नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता.नऊ) केले होते. 

परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी आणि समाजमन ओळखून कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी (ता.नऊ) केले. बुधवारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्विकारला. 

परभणी येथील जिल्हा परिषद सभागृहामध्ये मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी यांचा निरोप समारंभ व नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले यांच्यासह पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - मराठा आरक्षण : परभणीत जोरदार रस्तारोको

कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य समजून काम करणार 
श्री.टाकसाळे म्हणाले, आपण जिल्ह्यातील समाजमन ओळखून, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य समजून तसेच परभणी जिल्ह्याला अधिक सक्षम करण्यासाठी रूपरेषा आखून कामकाज करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवानंद टाकसाळे यांनी यापूर्वी नांदेड येथे उप जिल्हाधिकारी तर अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास नागपुर या ठिकाणी सेवा बजावलेली आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले पृथ्वीराज बी. पी. यांनी परभणी जिल्ह्यामध्ये घन वृक्ष लागवड मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध स्वच्छता मोहीम अशा अनेक विभागांतर्गत अभिनव उपक्रम राबविताना जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगले योगदान मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - नांदेड : शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा घालणारा व्यापारी काचावार पसारच

मुख्य कार्यकारी अधिकारी एस.टी. टाकसाळे रूजू 
परभणी ः जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.टी. टाकसाळे यांनी बुधवारी (ता.नऊ) पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्य कार्यकारी मंजुषा कापसे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी श्री.पृथ्वीराज यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख करतानाच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल, त्यांच्या शिस्तीबद्दलही कौतुक व्यक्त केले. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना बुधवारी एका कार्यक्रमातुन निरोप देण्यात आला. या वेळी आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह सदस्य, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will work by recognizing the society; Chief Executive Officer Shivanand Takasale, Parbhani News