उजेडातील थंडी आरोग्याला बाधक, रब्बी पिकाला साधक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

ज्वारी पीकासाठी थंडीचे हवामान पोषक ठरले असून, पीकाची चांगली वाढ होताना दिसून येत आहे, त्याचबरोबर पीकाची कळाही हिरवीगार झाली आहे. निसर्गाची कोणतीही अवकृपा झाली नाही तर किमान या पीकावर अशा हवामानामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा तरी प्रश्न यंदा अल्पप्रमाणात तरी सोडवता येईल

उजेड (जि. लातूर) : उजेड परिसरातील गावांमध्ये थंडीचा पारा वाढल्याने, जनजीवन गारठले आहे. पहाटे दैनंदिन व्यवहार सुरु करण्याआगोदर जागोजागी शेकोटी पेटवून ऊब घेतली जात आहे.  पण ही थंडी आरोग्याला बाधक, तर रब्बी पिकाला फायदेशीर ठरत आहे. 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

मागील आठवडाभरापासून उजेड व परिसरातील डोंगरगाव, बिबराळ, बाकली, हालकी या मांजरा नदीकाठावरील गावांमधून थंडी वाढलेली असून सकाळी दहा - अकरा वाजेपर्यंत कडाक्याचा गारठा जाणवतो आहे. सकाळच्या वेळी ग्रामीण भागात कराव्या लागणाऱ्या दैनंदिन कामांवर थंडीचा विपरीत परिणाम दिसून येतो आहे.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

सकाळी - सकाळी कडाक्याच्या थंडीत उजेड येथील महिलांचे सार्वजनिक नळावरील पाणी भरताना प्रचंड हाल होत आहेत. पहाटे शेतकऱ्यांना शेतीकडील कामांमध्येही थंडीमुळे अडचणी निर्माण होत आहेत, त्याचबरोबर थंडीमुळे होणाऱ्या ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी अशा आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांसोबतच जागोजागी शेकोट्या पेटवून शेकोट्यांची ऊब घेण्याची गरज भासत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामिण भागातील नागरीकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसत असला तरी शिवारातील रब्बी पिकांवर मात्र थंडीचा अनुकूल परिणाम जाणवत आहे.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

सिंचनाची सोय असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी दुष्काळ परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने आहे त्या पाण्यावर निघेल तेवढे पीक मेहनतीने घेऊन व त्याचबरोबर पशुधनाच्या चाऱ्याचीही सोय व्हावी म्हणून ज्वारी पीकाची पेरणी केली आहे. ज्वारी पीकासाठी थंडीचे हवामान पोषक ठरले असून, पीकाची चांगली वाढ होताना दिसून येत आहे, त्याचबरोबर पीकाची कळाही हिरवीगार झाली आहे. निसर्गाची कोणतीही अवकृपा झाली नाही तर किमान या पीकावर अशा हवामानामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा तरी प्रश्न यंदा अल्पप्रमाणात तरी सोडवता येईल अशी भावना शेतकरीवर्गातून बोलली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter in Latur Helpful For Rabbi Crop, but Harmful to Health