अरेच्चा..! प्रेमाची भूक बीडच्या प्राध्यापकाला पडली नऊ लाखांत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेने बीड जिल्ह्यातील कडा येथील एका प्राध्यापकाशी संवाद साधायला सुरवात केली. प्रेमाचा भुकेला झालेला हा प्राध्यापक महिलेच्या गोड संवादाला भाळला. नंतर या महिलेने घरी एकटीच असताना प्राध्यापकाला बीडला बोलावून घेतले. नेमके त्याच वेळी इतर दोन अनोळखी व्यक्ती घरात घुसले. नंतर या सर्वांनी मिळून या प्राध्यापकाला धमकावत नऊ लाख रुपये उकळले.

आष्टी (जि. बीड) - आष्टी तालुक्‍यातील कडा येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकास महिलेने प्रेमपाशात ओढून नऊ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याबाबत प्राध्यापकाने आष्टी पोलिसांत मंगळवारी (ता. 17) दिलेल्या फिर्यादीवरून महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघेही आरोपी फरारी आहेत. 

कडा येथील एका महाविद्यालयात नोकरी करणाऱ्या प्राध्यापकासमवेत बीडमधील एका महिलेने व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून मैत्री वाढविली. दोघांमध्ये प्रेमाचा संवाद होऊन महिलेने त्यास प्रेमपाशात अडकवून बीड येथे भेटण्यासाठी ये म्हणून वेळोवेळी बोलावले. तिच्या आग्रहावरून प्राध्यापक 15 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बीड येथील तिच्या घरी गेला.

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

यावेळी महिला घरी एकटीच होती. काही वेळाने तेथे दोन अनोळखी पुरुष अचानक घरात आले. त्यांनी प्राध्यापकास धमकावण्यास सुरवात केली. वाईट उद्देशाने तुम्ही घरात घुसला आहात, याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून बेअब्रू करू, अशी धमकी देण्यास सुरवात केली.

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

हे प्रकरण मिटवायचे असेल तर 20 लाख रुपये द्या, अशी मागणी प्राध्यापकाकडे करण्यात आली. बेअब्रू होण्याच्या भीतीपोटी प्राध्यापकाने त्यांना नऊ लाख रुपये दिले. दरम्यान, याबाबत प्राध्यापकाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांत वैद्य नावाच्या महिलेसह गणेश थोरात (दोघे रा. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सलीम पठाण करीत आहेत.

हे उघडून तर पहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman at Beed cheated on the professor

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: