तीनशे रुपयांची लाच घेताना महिला पोलिस जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

चारित्र्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी तीनशे रुपयांची लाच घेणाऱ्या महिला पोलिस अंमलदार रत्नमाला क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

उस्मानाबाद : चारित्र्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी तीनशे रुपयांची लाच घेणाऱ्या महिला पोलिस अंमलदार रत्नमाला क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले असून, त्यांना सैन्यामध्ये जॉईन होण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक होते. तक्रारदार यांना चारित्र्य प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलिस अंमलदार रत्नमाला बजरंग क्षीरसागर यांनी तीनशे रुपयाच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार केली. क्षीरसागर यांनी ३०० रुपये लाचेची मागणी करून पंचांसमक्ष घेतली असता त्यांना पकडण्यात आले. याबाबत आनंदनगर, पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू होती. पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी ही कारवाई केली. त्यांना पोलिस हवालदार इफ्तेकर शेख, पोलिस नाईक मधुकर जाधव, पोलिस शिपाई विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य व चालक श्री. करडे यांनी मदत केली.

तक्रार करा
कोणताही शासकीय अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे. तक्रार करण्यासाठी ९५२७९४३१०० या क्रमांकावर संपर्क करता येईल.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Police Trapped In Anti Corruption Bureau Osmanabad News