बीड जिल्ह्यातल्या गरजू कुटुंबांना 'वोपा' संस्थेतर्फे अन्न-धान्याची मदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मराठवाड्यातील गरजूंसाठी मदत पाठवत आहेत. पुढे येणाऱ्या गरजेनुसार आणखी 200 कुटुंबांना मदत करण्याचा मनोदय यावेळी वोपाचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी व्यक्त केला. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. 

बीड : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यातही जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रोजगाराच्या अभावातून या भागातील रोजंदारीवर काम करणारे कष्टकरी, विधवा महिला आणि रोज कसेबसे जेमतेम पोट भरणारे कित्येक गरीब कुटुंबं एक वेळ काहीतरी खाऊन दिवस काढत आहेत.

हीच गरज लक्षात घेऊन पुण्यातील ‘वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन’ (वोपा) ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने अशा 200 गरजू कुटुंबांना प्रत्येकी 10 दिवसांसाठीच्या अन्नधान्याची मदत केली आहे. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, मसूर डाळ, बेसनपीठ, साखर, मीठ अशा जीवनावश्यक अन्न पदार्थांची पाकिटे या गरजू कुटुंबांना देण्यात आली आहेत.

आणि बीडचे पालकमंत्री म्हणतात की..

वोपा ही संस्था मागील 2 वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण शाळांचा विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार मराठवाड्याचा शैक्षणिक विकास इतर भागाच्या तुलनेत बराच कमी आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन वोपा संस्था जिल्ह्यातील शिक्षणात सुधारणा करण्यासाठी बीड भागात काम करत आहे. 

डोमरी येथील सोनदरा गुरुकुलची मदत

मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यावर आलेल्या संकटाची ही स्थिती ओळखून वोपा संस्थेने आपल्या मुख्य कामाला बाजूला ठेऊन डोमरी येथील सोनदरा गुरुकुलच्या मदतीने गरजू कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला. वोपाने आपल्या मुख्य शैक्षणिक कामाला बाजूला ठेऊन वंचितांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांकडून संस्थेचं कौतुक होत आहे.

वृत्तपत्रांवर लोकांचा विश्वास कसा आहे वाचा

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मराठवाड्यातील गरजूंसाठी मदत पाठवत आहेत. पुढे येणाऱ्या गरजेनुसार आणखी 200 कुटुंबांना मदत करण्याचा मनोदय यावेळी वोपाचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी व्यक्त केला. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. 

वोपासोबत सोनदरा गुरुकुलम या सामाजिक संस्थेकडून अश्विन भोंडवे व रज्जाक पठाण यांनी सर्व काम पाहिले. या कामात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव व तहसीलदार आंबेकर यांनी व्यक्तिगत लक्ष दिलं. त्याबद्दल संबंधित सामाजिक संस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WOPA Helped Poor People In Beed Coronavirus Lockdown