esakal | उदगीर तालुक्यातील हत्तीबेट बनले ‘मिनी माथेरान’ !
sakal

बोलून बातमी शोधा

hatti bet.jpg

जागतिक पर्यटन दिन विशेष : उदगीर  वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांची भेट 

उदगीर तालुक्यातील हत्तीबेट बनले ‘मिनी माथेरान’ !

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : तालुक्यातील हत्तीबेट (देवर्जन) हे स्थळ मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी केली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवरील हत्तीबेट हे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आल्यामुळे जिल्ह्याची शान राखून आहे. हत्तीबेटाच्या डोंगरावर कोरण्यात आलेल्या लेणी, गुहा या प्राचीनत्वाच्या भूषण आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या बेटावर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही मोसमात पर्यटक व भाविकांची नेहमीच वर्दळ असते. वन विभागाने ओसाड असलेल्या माळरानावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. उद्यान विकसित करून पशू, पक्षी, वन्य प्राण्यांसाठी पाणवठे बांधून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी झोके, घसरगुंडी व चक्राकार खेळण्या बसविण्यात आल्यामुळे वन विभागाने निर्माण केलेले हे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक व विद्यार्थ्यांच्या सहली हत्तीबेटावर मोठ्या प्रमाणावर येत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धार्मिक स्थळही... 
हत्तीबेटावर श्री सद्‍गुरू गंगानाथ महाराज यांची संजीवन समाधी व दत्त देवस्थान, बालाजी मंदिर आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी श्री स्वामी समर्थ ध्यान मंदिराची सुविधाही या ठिकाणी आहे. दर महिन्याच्या एकादशीस कीर्तन व भजनाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. शिवाय दर पौर्णिमेस आरती, जप व महाप्रसादाच्या कार्यक्रमास हजारो भक्तगण हत्तीबेटावर येतात. दत्तजयंतीनिमित्त हत्तीबेटावर मोठी यात्रा भरते. वनौषधी वनस्पतीही या बेटावर आहेत. राज्य शासनाने या स्थळास ‘ब’ गट पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)