‘या’ बोर्डाने बांधल्या दोन हजारावर जोडप्यांच्या रेशीमगाठी

Nanded News
Nanded News

नांदेड : शीख समाजाचा ऐतिहासिक वारसा जपत असलेल्या नांदेड शहरात सर्वात मोठी धार्मिक आणि धर्मदाय संस्था म्हणून गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाचा नावलौकिक आहे. नांदेड शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये शंभर टक्के वाटा उचलणारी संस्था म्हणून देखील गुरुद्वारा बोर्डाचीच ओळख पुढे येते. बोर्डाच्या वतीने मागील तीस वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. शीख समाजासाठी हा एक मोठा उत्सवच असतो. 
  
गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने वर्षातून दोन वेळेस सामुदायिक विवाह मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. ‘मे’ आणि ‘डिसेंबर’च्या पहिल्या आठवड्यात सहसा लग्नांची तारीख ठरवण्यात येते. हा विवाह महोत्सव जरी दोन दिवसीय सामूहिक विवाह मेळावा म्हणून संबोधिले जात असला तरी एक मोठी प्रक्रिया बोर्डाला पार पाडावी लागते. शीख धर्माच्या परंपरा, प्रथा आणि शिकवणी प्रमाणे एकाच मंचावर अनेक जोपड्यांची लग्नं लावणं साधी गोष्ट नसते. पण बोर्डाने आणि सामाजिक बांधिलकीने शीख समाजातील सेवाभावीवृत्तीळे सारं काही व्यवस्थितपणे पार पडत असल्याचे आयोजकांनी सांगितले. आजवर दोन हजार २३९ गरीब कुटुंबिय या विवाह मेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आले आहेत.  

अशी झाली सुरुवात 
दोन दिवसीय सामूहिक विवाह मेळाव्याची सुरुवात तख्त गुरुद्वारा सचखंड बोर्डाने ३० नोव्हेंबर १९८९ आणि एक डिसेंबर १९८९ रोजी सुरु केला. पहिल्याच वर्षी १८ जोडप्यांचे  लग्नं लावून देण्यात आले. तत्पूर्वी गुरुद्वारा बोर्डाच्या विवाह मेळाव्यापूर्वी समाजात शीख युवक सेवा संघ या सामाजिक संस्थेने शीख समाजात पहिल्यांदाच सामुदायिक विवाह मेळाव्यास सुरुवात केली. या संकल्पनेत गुरुद्वाराचे माजी जत्थेदार संतबाबा जोगिंदर सिंघजी मोनी यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यावेळी माजी मीत जत्थेदार संतबाबा रतनसिंघजी, माजी हेडग्रंथी भाई जगिंदर सिंघजी, पंजप्यारे भाई अमरसिंघ जी सुखाई सह इतरांचे योगदान महत्त्वाचे ठरले. २०१५ ते १८ या काळात माजी आमदार सरदार तारासिंघ (मुंबई) यांनी नियोजनात योगदान दिले. सध्याचे अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंघ मिनहास यांच्या काळात दोन विवाह सोहळे झाले आहे. विशेष म्हणजे तीस वर्षांत बोर्डामध्ये कार्यरत सर्व सदस्य व व्यवस्थापन समितीचे योगदान मोठे राहिले आहे.  

अध्यक्षांनी स्वीकारले दायित्व
गुरुद्वारा बोर्डाच्या आता पर्यंतच्या ६० मेळाव्यात दोन हजार २०२ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या ६१ व्या मेळाव्यात ३९ लग्नांची आणखीन भर पडली आहे. सामूहिक विवाह मेळाव्यामुळे गरीब आणि गरजू शीख कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. मेळाव्यात वर आणि वधूंची नोंदणीसाठी फक्त एक हजार ६०० रुपये शुल्क आकारण्यात येते. परंतु, यावर्षी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदर सिंघ मिनहास यांनी मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्वच वर-वधूंची फी स्वतः भरण्याचे दायित्व स्वीकारले. संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले आणि संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले यांच्यातर्फे दोन दिवस मिष्ठान्न आणि पुरी तयार करण्याची सेवा केली जाते. एकूणच या उपक्रमाला शीख समाजाने जिव्हाळ्याने स्वीकारलेले आहे.  

ऋणानुबंधाचे नातं जपणारा उपक्रम
सामूहिक मेळावा हा उपक्रम बंद होऊ नये असे मत आहे. कारण हा फक्त लग्नाचाच एक उत्सव नसतो तर दक्षिण भारतातील शीख समाजाला दोन वेळेस एकत्र आणण्यासाठी एक सक्षम मंच देखील आहे. येथे वेगवेगळ्या शहरातील शीख समाज एकत्र येऊन शुभकार्यात सहभागी होतात. नवीन लग्नं ठरणाऱ्यांसाठी देखील हा उत्तम मंचच झालेला आहे. म्हणून समाजाच्या संग्रहणाला पोषक असे सामाजिक उपक्रम जगलेच पाहिजे. आज घडीला आजारी असलेल्या रवींद्र सिंघ शाहू यांच्या विचाराचे अनुसरण देखील याप्रसंगी योग्यच वाटते. अर्थातच समाजाचे तीस वर्षांपासून सुरु असलेले हे ऋणानुबंध नातं जोडणारी एक यंत्रणा आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com