एक मीटरचे अंतर ठेवून खरेदी करावी लागणार

राजेश दारव्हेकर
बुधवार, 25 मार्च 2020

हिंगोलीत खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे आता दोन ग्राहकांत एक मीटरचे अंतर ठेवण्याचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत. याचे योग्य पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे.

हिंगोली : राज्यात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस कर्फ्यू राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली. गर्दी टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असताना खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे आता दोन ग्राहकांत एक मीटरचे अंतर ठेवण्याचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत. याचे योग्य पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे.

देशात (ता.२५) मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये किराणा दुकान, औषधी दुकान, भाजीपाला यांचाही समावेश आहे. नागरिक सामान, भाजीपाला, औषधी खरेदी करण्यासाठी दुकानावर एकच गर्दी करत असल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सकाळी शहरातील किराणा दुकान, औषधी दुकानावर जाऊन कोरोना बाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा हिंगोलीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे : पालकमंत्री वर्षा गायकवाड

हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था

 तसेच दुकानासमोर विक्रेत्यांनी स्वतःहून दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राहील या हिशोबाने पट्टे मारून आखणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. दुकानदारांनी येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करणे गरजेचे आहे. नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये, प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांची संचारबंदीची घोषणा करताच शहरातील विविध किराणा दुकानावर तोबा गर्दी झाली होती. 

एका रांगेत केवळ तीन ते चार ग्राहक थांबणार

त्‍यामुळे दुकानावर होत असलेली नागरिकांच्या गर्दीमुळे जमावबंदीचे उल्‍लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बुधवारी सकाळी देखील शहरातील अनेक किराणा दुकान, भाजीमंडई येथे देखील मोठी गर्दी दिसत होती. या गर्दीवर आवर घालण्यासाठी त्‍यावर उपाययोजना म्‍हणून आता प्रत्‍येक किराणा दुकानादारांना ग्राहकांसाठी काही सूचना केल्या आहेत. या सुचना दुकानदाराने पाळणे बंधनकारक केले आहे. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकानावर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसाठी एका रांगेत केवळ तीन ते चार ग्राहक उभे करून उभे राहण्यासाठी पट्टे आखण्यात आले आहेत. 

येथे क्लिक कराहिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या

त्या पट्यावर उभे राहूनच खरेदी करावी लागत आहे. संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे कुणीही घाबरू नये, खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. तसेच मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी देखील दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. त्‍यामुळे किराणा दुकानवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You have to buy a distance of one meter