युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

उस्मानाबाद : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठवाड्यातून दोन उमेदवार भवितव्य अजमावत आहेत. त्यांना सांगली, पुणे, नगर जिल्ह्यांतून तगडे आव्हान मिळत आहे.

काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाच्या काळात दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न युवक नेत्यांकडून केला जात आहे. संपर्क वाढवून मतदान आपल्या पारड्यात घेण्यासाठी पळापळ सुरू केली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी यंदाही मोठी चुरस असणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक शिवराज मोरे मैदानात उतरले आहेत. ते सध्या युवकचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांनीही कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तयारी सुरू केली आहे. याशिवाय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांनीही दंड थोपटले आहेत. विदर्भातून सहकार्य मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

हेही वाचा: सदृढ शरीरासाठी जिमची क्रेझ

महिलांमधून शिवानी वडेट्टीवार यांनीही आपले भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. अब्दुल अमेर सालीम यांनी औरंगाबाद येथून उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय विद्यमान प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावरूनही प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय अपेक्षित आहे. विजयसिंह चौधरी पुण्यात मैदानात उतरले आहेत. ते विश्वजित कदम यांचा पाठिंबा मिळविण्यात किती यशस्वी होतात, याकडे लक्ष आहे. विश्वजित कदम हे कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात, यावरून नूतन अध्यक्ष निश्चित होईल, अशी पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत आहे. अनिकेत म्हात्रे (मुंबई) हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

पंधरा उमेदवार रिंगणात

प्रदेशाध्यक्ष पदासाठी एकूण १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये अनिकेत म्हात्रे (मुंबई), मनोज कायंदे, प्रशांत ओगले, तन्वीर अहमद कुरेशी, आकाश गुजर, निखिल कांबळे यांच्यासह रेखा पवार, सोनालक्ष्मी घाग, कल्याणी रांगोळे, शिवानी वडेट्टीवार उमेदवार आहेत.

उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस

‘युवक’च्या जिल्हाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर पवार, श्रीनिवास पाटील, अवधूत क्षीरसागर, अण्णासाहेब महानोर, कन्हय्या कडगंचे, रूपाली माटे यांच्यात चुरस आहे. जास्तीची मते मिळणाऱ्यास अध्यक्षपद, त्यापेक्षा कमी मिळालेल्याला उपाध्यक्ष अशी विभागणी केली जाते.

मराठवाड्यातून दोन उमेदवार

मराठवाड्यातून औरंगाबादचे अब्दुल अमेर सालीम यांची उमेदवारी आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील शरण पाटील हेही भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस पक्षाचे विद्यमान कार्याध्यक्ष बसवराज पाटील याचे ते चिरंजीव आहेत. १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. मतदान करणाऱ्या सदस्याने ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याला तत्काळ (ऑनलाइन) मतदान करता येणार आहे.

loading image
go to top