
अंबड शहरापासून जवळच असलेल्या जालना-बीड महामार्गावरील रामनगर फाट्याजवळ सोमवारी (ता.चार) सकाळी सात वाजेच्या दरम्यान दुचाकी व मालट्रकची समोरासमोर झालेल्या अपघातात तरुण ठार झाला.
अंबड (जि.जालना) : अंबड शहरापासून जवळच असलेल्या जालना-बीड महामार्गावरील रामनगर फाट्याजवळ सोमवारी (ता.चार) सकाळी सात वाजेच्या दरम्यान दुचाकी व मालट्रकची समोरासमोर झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. अमोल शिनगारे (वय २८) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबड तालुक्यातील झिरपी येथील अमोल शिनगारे हा अंबड शहरातील हॉटेलमध्ये काम करून आपल्या कुटूंबाचा प्रपंच चालवीत होता.
शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'
तो नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी झिरपी येथून अंबड शहरातील हॉटेलमध्ये कामासाठी आपल्या दुचाकीवरून अंबडकडे जात असताना गावापासून काही अंतरावर रामनगर फाट्याजवळ येताच अंबडकडून बीडकडे जाणाऱ्या मालट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये अमोल शिनगारे जागीच गत प्राण झाला. अमोलचा मृतदेह शवविच्छेदन उत्तर तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अमोल याच्यावर शोकाकुल वातावरणात झिरपी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,आई, वडील, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. या घटनेची अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संपादन - गणेश पिटेकर