एक लॉकडाउन प्रवास: मॅंचेस्टर ते मुंबई...

dr jigisha kulkarni
dr jigisha kulkarni

मुंबईतील डॉ. जिगीषा विनायक कुलकर्णी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी ब्रिटनला गेल्या होत्या. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने त्या दीड महिना तेथेच अडकल्या. लंडनहून भारतात आलेल्या पहिल्या विमानाने त्या परत आल्या. ब्रिटनमधील लॉकडाउन आणि भारतात परत येण्यासाठीचा प्रवास याविषयी त्यांनी केलेले अनुभवकथन...

रात्री अकराची वेळ.... लॉकडाउनमुळे सुनसान असलेले ब्रिटनमधील रेल्वे स्टेशन... प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्यात पाच-सहा जणांचे एक टोळके सिगारेटचे धूर सोडत उभे... संपूर्ण स्टेशनवर एकच प्रवासी तरुणी... परदेशात रात्रीच्या वेळी एकटी प्रथमच प्रवास करत असल्याने गोंधळलेली... हातात सुमारे पन्नास किलो वजनाच्या बॅगा सांभाळत, रेल्वेच्या चौकशीसाठी कोणी दिसते का हे भेदरलेल्या नजरेने शोधणारी...

एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटते ना... पण काही दिवसांपूर्वी हे मी प्रत्यक्ष अनुभवले.
मुंबईत एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युऐशनकरता प्रवेश परीक्षा देण्यासाठी ब्रिटनला एकटीच गेले होते. २३ एप्रिलला परीक्षा होती. १० मार्चला क्लास संपले. परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोरोनाचे संकट आले. सारे जगच थांबले. ब्रिटनमध्येही लॉकडाउन झाले. अर्थात भारताइतके कडक नव्हते. तेथे दुकाने उघडी होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत खरेदी वगैरे साठी बाहेर जाता येत होते. मी मँचेस्टरमध्ये अपार्टमेंट घेऊन राहात होते. आईवडीलांपासून इतके दूर,परदेशात, तेही एकटी मी प्रथमच गेले होते. लॉकडाउनमुळे साहजिकच ते दोघेही अस्वस्थ होते. भारतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या बातम्या कळत होत्या. अर्थात तेवढी गंभीर स्थिती माझी नव्हती. माझ्या डोक्यावर छप्पर होते. खाण्यापिण्याच्या वस्तू मिळत होत्या. कोर्स काळात ब्रिटनमधील काही नव्या मैत्रिणी मिळाल्या. त्यात काही भारतीयही होत्या. त्यांना आमच्या परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे त्यांच्याकडून मानसिक आधार निश्चितच मिळत होता.

हे सारे असले तरी शेवटी मायभूमीची ओढ होतीच... त्यामुळेच लॉकडाउननंतर भारतात ८ मे रोजी जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटसाठी विचारणा झाली, तेव्हा टू बी ऑर नॉट टू बी अशी अवस्था झाली. जावे की न जावे.... भारतात आईबाबा काळजीत असल्याने लगेच परत जावे असे वाटत होते, त्याचवेळी प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होईल, असे सांगण्यात येत असल्याने, पुन्हा यायला मिळेल की नाही, त्यापेक्षा परीक्षा देऊनच जावे,असेही एक मन सांगत होते. पण परीक्षा जुलैमध्ये होणार की नाही, हेही सांगता येत नव्हते. कारण सारे काही कोरोनाच्या परिस्थितीवर अवलंबून होते. त्यामुळे तीही शाश्वती नव्हती. शिवाय पहिल्याच विमानात आपल्याला संधी मिळेल, ही शक्यताही कमी वाटत होती. त्यामुळे घरी फोन केला. आईबाबांना विचारले. पहिल्याच फ्लाइटमध्ये मला संधी मिळाली. एकाच तासात निर्णय कळवायचा होता. एअर इंडियाचा मेल आला होता, त्यात माझे सर्व डिटेल्स होते. त्यांनी फोनवर मला तिकिटांच्या पैशांसाठी डेबीट कार्डचे डिटेल्स विचारले (सीव्हीव्हीसह). तेव्हा जरा घाबरले. द्यावे की नाही, असा संभ्रम निर्माण झाला. कारण येणारा फोन, मेल अधिकृत आहे की नाही, हेही समजत नव्हते. शिवाय भारतात परत येण्यासाठी मी अनेक ठिकाणी अर्ज दिले होते. त्यावरून त्यांना माहिती मिळविणे शक्य होते. घाबरतच डिटेल्स दिले. पण ते चालले नाही. शेवटी मी मुंबईतून बाबांकडून त्यांच्या कार्डचे डिटेल्स मागवून घेऊन दिले. त्यातून तिकिटाचे पैसे घेतले गेले. इतर माहितीबरोबरच प्रवासात स्वतःबरोबर पुरेसे खाण्याचे पदार्थ घ्यावेत, अशी सूचना त्या मेलमध्ये होती.

भारतात परतायचे निश्चित झाले. विमानतळावर सुरक्षाविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार होते. मला पॅकिंगसाठी फारच कमी अवधी मिळाला. तेवढ्या वेळात लहान- मोठ्या अशा चार बॅगांमध्ये मी सामान भरले. साधारण ५० किलोपर्यंत वजन झाले. फ्लाइट लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून होते. त्यासाठी मला मँचेस्टर ते लंडन असा साधारण दोन तासांचा रेल्वे प्रवास करावा लागणार होता. कॅब बुक करून मँचेस्टर रेल्वे स्टेशनला गेले, रेल्वेने लंडनच्या यूस्टनला पोहोचेपर्यंत रात्रीचे ११ वाजले. तेथून हिथ्रो विमानतळावर जाण्यासाठी कॅब बूक करण्याचा विचार केला पण कॅब उपलब्ध नव्हत्या. बस हाच एक पर्याय होता. पण तीन/चार बस बदलाव्या लागणार होत्या. महत्प्रयासाने एक बस मिळाली. माझ्याकडच्या चार बॅगांसह त्यात चढले.  तेथील बसमध्ये बसण्यासाठी सीट कमीच असतात. उभ्यानेच प्रवास करावा लागतो. व्हिलमुळे माझ्या दोन बॅगा बसभर फिरत होत्या. त्या आवरता आवरता माझी पुरती वाट लागली. त्यातही एक गमतीशीर प्रसंग घडला. बसमध्ये चढण्यापूर्वी एक महिला माझ्यामागे लागली होती. ती बेघर झाली होती. मदतीची याचना करत होती.  मी बरोबर फारशी कॅश घेतली नव्हती. तिला मदत करणेही शक्य नव्हते. तिच्याकडे पाहत असताना माझी अवस्थाही तिच्यासारखीच झाली आहे, असे एक क्षण वाटून गेले.

बसचा त्रासदायक प्रवास संपला आणि मी किंग्स क्रॉस अंडरग्राउंड ट्यूबरेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथे तर सगळेच अनाकलनीय होते. चौकशी करायला कोणी माणूसही दिसत नव्हता. एक जॅकेटवाला कर्मचारी दिसला. त्याने तिकिटघर तळघरात असल्याचे सांगितले. स्टेशनवरची लिफ्ट कशी ऑपरेट होते, हेही माहित नव्हते. तिथे सांगायलाही कोणी नव्हते. रात्रीचे ११ वाजलेले... माझ्याकडे स्वसंरक्षणासाठी कोणतेही साधन नव्हते. त्यात त्या तळघरात सेलफोनही चालेना. संपूर्ण प्लॅटफॉर्म रिकामा. एका कोपऱ्यात एक टोळके सिगारेट ओढत उभे होते.  मी एकटीच, बरोबर चार बॅगा, त्यांच्या व्हिलचा आवाज ती भयाण शांतता चिरून जात होता.... आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती, अशा प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. धीर एकवटून ट्रेनची वाट पाहात उभी राहिले. ट्रेन मिळाली. त्यातही फारसे कोणी नव्हतेच. एक तासाचा प्रवास होता.
हिथ्रो विमानतळावर पोचले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता.  बॅगांचे ओझे उचलून हात आणि सारे अंगच दुखू लागले होते. पण पर्याय नव्हता. नशिबाने तेथे एक मुंबईचा सहप्रवासी भेटला, तेवढाच जिवात जीव....

फ्लाइटसाठी रिपोर्टिंग टाइम सकाळी आठचे होते. ई-मेलमधील सूचनेनुसार मी बरोबर पुरेसे खाद्यपदार्थ, फळे घेतली होती. अन्यथा उपासमार अटळ होती, कारण अख्खी रात्र काढावी लागणार होती आणि विमानतळावर काहीही नव्हते.  सगळी रात्र खुर्चीत बसून काढली. सकाळी सहा वाजताच तेथील कर्मचारी, पोलिसांनी प्रवाशांची रांग लावायला सुरुवात केली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग वगैरे सर्व नियम पाळले गेले. थर्मल स्कॅन, टेंपरेचर तपासणी झाली. विमानात कर्मचारी, एअर होस्टेस होत्या. पण प्रवाशांपासून लांब... ते प्रवाशांना काहीच मदत करत नव्हते.  अर्थात त्याचे काही विशेष वाटले नाही. भारतात परत निघालोय, हेच मोठे होते.

भारतात आल्यानंतर क्वारंटाइन व्हावे लागणार, हे माहित होते, पण त्यासाठीही मोठ्या दिव्यातून जावे लागणार, याची पुसटशीही कल्पना नव्हती. फ्लाइट मुंबई विमानतळावर पोचल्यानंतर पुन्हा रांगा... टेंपरेचर तपासणी सारे सोपस्कार पार पडले. नंतर क्वारंटाइन होण्यासाठी हॉटेलची निवड.... फाइव्हस्टारपासून टूस्टारपर्यंत... चौदा दिवसांचे राहण्या- जेवणाचे बिल त्याचवेळी द्यायचे...  हॉटेलची निवड करून रुममध्ये पोचले. दोन दिवसांचा शीण घालविण्यासाठी अंघोळ करून मस्त झोप काढण्याचा विचार केला. त्यासाठी  बॅगाही उघडल्या. काही वेळातच समजले, त्या हॉटेलमध्ये एसीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट व्हावे लागणार... पुन्हा बॅगा उचलल्या... पुन्हा थर्मल चेकिंग... या सगळ्यांत नुसतीच ओढाताण... दुपारी तीनपर्यंत जेवणाचाही पत्ता नव्हता. पण त्यावेळी जेवणापेक्षाही गरज होती झोपेची... कारण आदल्या दोन दिवसांपासूनचा शारिरीक आणि मानसिक ताण होता आणि आता त्राण उरले नव्हते.

त्या हॉटेलमध्ये चौदा दिवस क्वारंटाइन राहिले. रुममध्ये मी एकटीच.. दरवाजाला एक टेबल लावलेले... जे काही पाहिजे असेल, ते फोनवरून सांगायचे. हॉटेलचा कर्मचारी बाहेर टेबलवर आणून ठेवणार आणि निघून जाणार. मग ते आत घ्यायचे. नशिबाने जवळ मोबाईल, लॅपटॅप होता. तेवढाच काय तो जगाशी संबंध...

या सगळ्या काळात माझ्या दृष्टीने एक गोष्ट समाधानाची होती. मी स्वतः डॉक्टर आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय करायचे आणि संसर्ग झालाच तर काय काळजी घ्यायची, याची माहिती मला आहे. लक्षणे दिसली असती तर मी स्वतः उपचार करू शकले असते. असे जरी असले तरी ब्रिटनमधून भारतात परत येण्याचा हा प्रवास परीक्षा घेणाराच ठरला... अर्थात आयुष्यातील कोणत्याही कठिण प्रसंगाला आपण सामोरे जाऊ शकतो, हा आत्मविश्वास देणाराही...
(शब्दांकन : नयना निर्गुण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com