पुरोगामी राजा : छत्रपती राजर्षी शाहू महाराज 

प्रा. डॉ. सतीश मस्के
Thursday, 25 June 2020

छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक समता हे समीकरण फार महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहू महाराज आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्‍य- बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी प्राणपणाने लढले. ते एक कृतिशील आणि प्रयोगशील राजे, समाजसुधारक, विचारवंत होते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 26 जूनला जयंती. त्यानिमित्त... 

छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय- अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा आहे; परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे, हे "एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही' या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. 

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती वयाच्या 20 व्या वर्षी 1894 मध्ये सत्ता हाती आली. त्यांच्या हातात सत्तेची सूत्रे येताच त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानातील प्रजेच्या हलाखीची पाहणी केली. संस्थानात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प, मागासलेला समाज, अप्रवाही, जातीपातींनी दुभंगलेला व जातीयवादाने फार पोखरलेला होता. शेकडो वर्षे अस्पृश्‍य समाज, बहुजन समाज ज्ञान, सत्ता, संपत्ती, शिक्षण अशा अनेक गोष्टींपासून वंचित राहिला होता. चातुवर्णव्यवस्थेमुळे सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात मागे होता. अस्पृश्‍य, गरीब, शेतकरी, मजूर यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत होते. सामान्य जनता भयानक दारिद्य्र, अज्ञानाच्या, अंधश्रद्धा, रूढींच्या खाईत बुडाली होती. शिक्षण क्षेत्रात बहुजन समाज बोटावर मोजता येईल इतकाच होता. पाणी, रस्ते, शेती, व्यापार, कला अविकसित होत्या, म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग या रंजल्या- गांजलेल्या लोकांसाठी केला, हे आजच्या स्वार्थी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत 
राजर्षी शाहू महाराजांच्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणाशिवाय सुधारणा होणार नाही म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन 1907 मध्ये "मिस क्‍लार्क बोर्डिंग' नावाचे वसतिगृह उघडले. शिक्षणाचा प्रचार- प्रसार व्हावा म्हणून 1916 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या सुरू केल्या. तसे आदेश त्यांनी जारी केले. आजच्या परिस्थितीत आजचे राज्यकर्ते शाळा, महाविद्यालये, शिष्यवृत्त्या बंद करीत आहेत. हे समाजहित, देशहिताच्या दृष्टीने घातक आहे.

आरक्षणातून प्रगती 
चातुर्वर्णव्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली असल्यामुळे आणि प्रत्येकाला जातीनुसार काम वाटून दिले असल्यामुळे अस्पृश्‍य समाजात प्रगती होत नव्हती. शिक्षण नव्हते. खालच्या वर्गातील माणूस वरच्या वर्गात जाऊ शकत नव्हता. अस्पृश्‍य लोकांची प्रगती व्हावी, त्यांचे दारिद्य्र दूर होऊन त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांचे जीवनमान उंचवावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्‍यांसाठी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याची क्रांतिकारी घोषणा करून 26 जुलै 1902 ला लंडनहून आदेश काढून क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ते आरक्षण आज पूर्णपणे भरले जात नाही. उलट त्याविषयी गैरसमज पसरविले जाताना दिसतात. 
 

अस्पृश्‍योद्धाराचे कार्य 
वेदोक्त प्रकरणावरून त्यांना जातीयतेचा अनुभव आला. माझ्यासारख्या राजाबरोबर हे असे वागत असतील, तर सामान्य माणसांचे काय खरे आहे? म्हणून त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचे ठरविले. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य संस्थांनापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची पकड होती. त्यामुळे अस्पृश्‍य समाजाचे फार हाल होत होते. माणूस म्हणून त्यांच्याकडे कुणी पाहत नव्हते. विषमतेमुळे त्यांचे जीवन पोखरून निघाले होते. भयभीत झाले होते. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्‍य जातीच्या लोकांना उपाहारगृहे, हॉटेल (गंगाराम कांबळे), दुकाने चालविण्यासाठी आर्थिक मदत केली. पारध्यांच्या लोकांना तिजोरीच्या चाव्या दिल्या. सत्यशोधक समाजाची स्थापना करून फुले नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले. अस्पृश्‍य समाजातील व इतर गरीब समाजातील लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या. वकिलीच्या सनदा दिल्या. जातीयता कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांना मान सन्मानाचे जीवन दिले. आज देशात वाढत असलेली जातीयता, हतबलता ही आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन शाहू महाराजांचे कार्य लक्षात घेण्यासारखे आहे. 

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर 
छत्रपती शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप आदर आणि अभिमान होता. म्हणून ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबई येथे त्यांच्या घरी गेले. त्यांचा सत्कार केला. त्यांना वृत्तपत्र काढण्यासाठी व इतर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून माणगाव परिषदेत अस्पृश्‍य व इतर बांधवांना त्यांचा परिचय करून देऊन सांगितले की, माझ्यानंतर अस्पृश्‍योउद्धारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असतील. असा मोठ्या मनाचा राजा होता. जे आपल्याला आज विविध क्षेत्रात शोधूनही असा माणूस सापडणार नाही. म्हणूनच त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी "मोठ्या दिलाचा राजा' असे म्हटले आहे. 

आंतरजातीय विवाहाला मान्यता 
स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि जातीयता नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी कार्य केले. 1918 साली त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. स्वतःच्या घरात धनगर घराण्याची नाते जुळून कृतीत उतरवून आणला. जातीयता कमी व्हावी म्हणून त्यांनी स्वतः काही विवाह घडवून आणले. विधवा विवाहास मान्यता दिली. 1920 मध्ये घटस्फोटाचा कायदा केला. स्त्रियांचा सच्चा पाठीराखा होता. हेही आज देशात होत असलेल्या स्त्रियावरील अन्याय अत्याचार अत्याचारावरून आजच्या राज्यकर्त्याचे डोळे उघडणे गरजेचे आहे. 

व्यापार, कला, क्रीडा, साहित्य व इतर कलांना मदत 
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना व्यापार, कला, नाट्य, संगीत या विषयीही आवड व आदर होता. व्यापारी क्षेत्रात गरुड झेप घेऊन सूतगिरण्या कापडगिरण्या वाढविल्या. राधानगरी धरण अस्तित्वात आणले. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी बंधारे बांधले. अल्लादिया खान यांच्यासारख्या गायकाला बाबूराव पेंटरला आश्रय दिला. नाटक कंपन्या सुरू केल्या. 

अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराज हे सामान्य माणसात मिळणारे, सामान्यांसाठी झटणारे राजा होते. सामाजिक लोकशाही निर्मितीसाठी शाहू महाराजांनी अतोनात कष्ट उपसले. सर्वांना न्याय मिळावा, माणुसकीचे हक्क मिळावेत, अस्पृश्‍यांना समानतेची व माणुसकीची वागणूक मिळावी, वैज्ञानिकता त्यांच्या अंगी यावी म्हणून त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केला. यावरून शाहू महाराजांचे मोठेपण हे लक्षात यायला लागते. आज मात्र आम्ही व आमच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श बाजूला ठेवला आहे. त्यांचे नाव घेऊन आम्हीही त्यांचेच आहोत म्हणणारेही त्यांच्या विचाराने वागत नाहीत उलट आपल्या सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. मानवी मूल्य पायदळी तुडवताना दिसतात. ज्या शाहू महाराजांनी लोकशाही निर्मितीसाठी कष्ट उपसले, त्याच लोकशाही धिंडवडे काढताना आजचे राज्यकर्ते आम्हाला दिसत आहेत. आम्ही समाजाचे काही देणे आहोत, समाजाच्या प्रगतीसाठी आपलेही काही योगदान असावे, असे मात्र आताच्या कुठल्याच राज्यकर्त्यांना वाटत नाही एवढे भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहते. स्वार्थासाठी, मतलबासाठी, जातीसाठी, धर्मासाठी राजकारण करणे चालू आहे परंतु मानवतेसाठी, मानवी कल्याणासाठी राजकारण करावे लागते हे मात्र त्यांनी राजर्षी शाहू महाराजांकडूनच शिकायला हवे, त्या पद्धतीनेच आपली सत्ता पुढे घेऊन जायला हवी व सामान्याचे हित जोपासायला हवे. त्यांच्या विचारांची, आचारांची व कृतीची आज देशाला गरज आहे. प्रत्येक मानवाने त्यांच्या विचाराने कार्य केले तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. 

(लेखक पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi article dhule Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj