esakal | अहो, लोकमान्य!
sakal

बोलून बातमी शोधा

lokmanya tilak

एक ऑगस्ट म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. शाळा सुरु असल्या म्हणजे या दिवशी विद्यार्थ्यांच्या भाषणांचा चांगलाच फड रंगतो. पण यंदा प्रथम लोकमान्यांची पुण्यतिथी शाळांमध्ये गुंजणार नाही, असं चित्र आहे. तथापि, लोकमान्यांना शब्दसुमांजली देण्याचं काम केलेलं आहे. या लेखाद्वारे लोकमान्यांची जाज्जल्य मूर्ती आपल्यासमोर जणू उभी राहील.....

अहो, लोकमान्य!

sakal_logo
By
- डॉ. नीरज देव


आज तुमचा पुण्यशताब्दी दिन... बरोबर शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण नश्वर देह त्यागला होतात. गीतेचा कर्मयोग आचरत आचरत त्यागला होतात. आपण दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराच्या गर्जनेला अद्यापि चार ही वर्षे उलटली नव्हतीत, वयाची साठी जेमतेम उलटी होतीत, त्यावेळी आपण आपला देह त्यागलात. ज्याकाळी या देशाला ‘देशरुप’ नव्हतं, या देशातील माणसाला मनुष्यात्वाची जाणीव नव्हती, स्वत्व नव्हतं, स्वाभिमान नव्हता, इंग्रजांची गुलामगिरी अभिमानाची वाटत होती त्याकाळी आपण जन्मलात ! देशाला देशरुप देण्यासाठी धडपडलात.

इंग्रजी शिक्षणाने आपली दृष्टी दिपली नाही, बुद्धी इंग्रजाळली नाही उलट अधिकच तेजस्वी बनली, धारदार बनली, देशलीन झाली. चतुःसूत्रीचा घोष करण्याच्या कैक दशके आधीच आपण राष्ट्रीय शिक्षणाचा श्रीगणेशा केला. केसरी, मराठा सारखी वृत्तपत्रे काढून जनतेला स्वराज्याचे बाळकडू पाजले, स्वराष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. अन् ती देता देताच केसरीच्या ‘गजालि श्रेष्ठा’ या बोधवचनातून परकीय इंग्रजांना इशारा दिला की तुम्ही येथे वास्तव्य करु नका; कारण या देशातील जनता म्हणजे सुस्त पहुडलेला सिंह आहे, तो जागृत झाला तर तुमची खैर नाही अन् या सिंहाला जागवण्याचे असिधाराव्रत तुमच्या अग्रलेखांनी केले.

यावरच न थांबता युक्तीची देवता गणपती उत्सवाला आपण सार्वजनिक रुप दिलंत. हेतु हाच की ‘बहुत लोक मेळवावे; एक विचारे भरावे’ त्यांना त्या एकमतात आणण्यासाठी आपण शिव जयंतीचा घाट घातला. जनाजनाच्या मनात असलेल्या सुप्त शिवभक्तीला जागृत केलं. तुम्हाला ठाऊक होतं की एकदा शिवभक्ती जागवली की स्वराज्याची उत्कटता आपसुकच वाढू लागते.

चापेकर, सावरकर, खुदीराम, कान्हेरे सा-यांसाठी तुम्ही तुमची लेखणी उचलली, कैकवेळा तुरुंगवास भोगला काळेपाणी भोगलं, मंडालेचा तुरुंग आपल्या गीतारहस्याने दरवळून टाकला. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असं आपलं सार्थ वर्णन करणाऱ्या चिरोलला अन् मकमिलन प्रकाशन संस्थेला आपण भर लंडनमध्ये जाऊन, इंग्रजांच न्यायासनात, त्यांच्याच आयुधाने चोपलंत. आपल्या न्याय व्यवस्थेचा जगभर ढिंढोरा पिटणाऱ्या ब्रिटिश न्याय व्यवस्थेचे वाभाडे त्यांच्याच देशात जाऊन काढलेत. आपल्या हातातले बाहुले म्हणून ह्युम साहेबांनी स्थापलेल्या राष्ट्रीय सभेला स्वराज्याचा उद्घोष आपणच करायला लावला होतात. इथेही इंग्रजांच्या आयुधाने तुम्ही इंग्रजांचेच शरसंधान केले. धन्य तुमच्या बुद्धीचातुर्याची; धन्य तुमच्या मुत्सद्धीपणाची...

आपल्या मृत्युनंतर ही भारतीय राजकारण व्यापून टाकणारे नेते आपणच या देशाला दिलेत. राष्ट्रपिता गांधी गोखल्यांचे नाव घेत आपल्याच पदपथावरुन चालत होते, अखंड हिंदुस्थानचे प्रणेते सावरकर आपल्यालाच गुरुणां गुरुः म्हणून वंदन करीत होते तर पापस्थानचे निर्माते जिन्हांच्या काळजाच्या कोपऱ्यात आपणच होतात, रा. स्व. संघाचे संस्थापक हेडगेवार आपल्याच छत्रछायेत धन्यता मानत होते अन् योगी नामाभिधानाने विश्वविख्यात श्रीअरविंद आपलेच अनुगामी होते. थोडक्यात भावी भारताचे सारे महापुरुष आपल्याच पायी विराम घेत होते. सर्व नेत्यांना मान्य असणाऱ्या लोकमान्या; आमचा प्रणाम स्वीकार करा!!

ज्या जन्मसिद्ध अधिकाराची सिंहगर्जना करुन आपण आम्हाला जागवलंत, तो अधिकार मिळविण्याचे चैतन्य आमच्यात खेळवले तो अधिकार आपल्या मृत्युला सत्तावीस वर्षे अन् चवदा दिवस उलटतात न् उलटतात तोच आम्ही मिळविला. त्याच स्वराज्यात, नव्हे, नव्हे; पूर्ण स्वातंत्र्यात आम्ही जन्मलो. त्याच अधिकाराचा येथेच्छ उपभोग घेत आम्ही आमचे कर्तव्य विसरत चाललोत. ज्या अधिकारासाठी आपण झिजलात, कर्तव्य भावनेने झिजलात ती कर्तव्य भावना! ते समर्पण! नव्हे, नव्हे; त्याचा शंताश तरी आमच्यात जगावा म्हणून स्वातंत्र्य केसरी, राष्ट्र पितामहा! आम्हाला आशिर्वच दे! शुभाशिष दे...