कोकण किनारपट्टी पर्यटनाच्या विकासाने बहरणार; स्थानिकांची होणार बेरोजगारीतून मुक्तता

प्रमोद जाधव
Saturday, 15 August 2020

कोरोनामुळे कोकणातील पर्यटन विकासावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी कोकणात बीच शॅक पॉलिसी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. यातून सागरी किनारपट्ट्यांवरील पर्यटन व्यवसाय भरभराटीला येण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी स्वातंत्रदिनाच्या ध्वजारोहणाप्रसंगी केले.

अलिबाग : कोरोनामुळे कोकणातील पर्यटन विकासावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी कोकणात बीच शॅक पॉलिसी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. यातून सागरी किनारपट्ट्यांवरील पर्यटन व्यवसाय भरभराटीला येण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी स्वातंत्रदिनाच्या ध्वजारोहणाप्रसंगी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलिस कवायत मैदान येथे पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे. गेले पाच महिने आपण सगळेच या विषाणूशी सर्व साधनसामुग्रीसह एकवटून लढा देतोय. कोरोनाची तपासणी करण्यासाठी लवकरच जिल्हा रुग्णालय येथे सुसज्ज अशी आरटीपीसीआर प्रयोगशाळाही सुरू केली जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. 

हेही वाचा : सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

कोरोनाबरोबरच जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचेही संकट आले. वेगवेगळ्या विभागाशी समन्वय साधून नियोजनबद्ध आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी टाळण्यास यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची घोषणा केली आहे. हे अभियान अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी या पाच खांबावर असणार आहे. या अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली. 2020 मध्ये हे पॅकेज या अभियानाला नवी गती देईल, असे तटकरे यांनी सांगितले. 

हेही वाचा : वरंध घाट छोट्या वाहनांसाठी लवकरच खुला होणार; पुण्याच्या चाकरमान्यांना दिलासा

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अपर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, सामान्य प्रशासन विभागातील उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हापुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा आदी मान्यवर व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

सागरी मार्गामुळे विकासाला नवे रूप 
रेवस ते रेडी सागरी महामार्गाच्या कामासाठी सरकारने 4 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरूड, दिघी, दिवेआगर, शेखाडी मार्गे रेडी या भागांतून हा सागरी महामार्ग जाणार आहे. यामुळे येथील पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार आहे, असे मत पालकमंत्री तटकरे यांनी व्यक्त केल्या. 

कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान 
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा व प्रसारमाध्यमे प्रतिनिधींचा या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. रोहयाचे नायब तहसीलदार संजय नागावकर, पनवेल तालुक्‍यातील केळवणेच्या अंगणवाडीसेविका नंदा ठाकूर, पेण तालुक्‍यातील ग्रामपंचायत कणे येथील हरिश्‍चंद्र शंकर म्हात्रे यांना मरणोत्तर कोव्हिडयोद्धा सन्मान देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारला.  

 (संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kokan coast side will bloom for tourist; Flag hoisting by guardian minister aditi tatkare