शेवाळ्यांमुळे महापे भुयारी मार्ग जीवघेणा; रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांना अपघात

शरद वागदरे
Thursday, 22 October 2020

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली व सविता केमिकल येथील उड्डाणपूल आणि महापे येथील भुयारी मार्गाचे तीन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते; मात्र अजूनही कामात सुधारणा नाही.  खाडीच्या पाण्याच्या पातळीपेक्षा भुयारी मार्गाची पातळी अधिक खोल असल्याने येथे ओलावा राहत आहे. त्‍यामुळे रस्त्यावर शेवाळ साचले असून दुचाकी घसरून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

वाशी ः ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली व सविता केमिकल येथील उड्डाणपूल आणि महापे येथील भुयारी मार्गाचे तीन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते; मात्र अजूनही कामात सुधारणा नाही.  खाडीच्या पाण्याच्या पातळीपेक्षा भुयारी मार्गाची पातळी अधिक खोल असल्याने येथे ओलावा राहत आहे. त्‍यामुळे रस्त्यावर शेवाळ साचले असून दुचाकी घसरून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने रबाले ते घणसोली हा १.४ किलोमीटरचा तर पावणे येथील सविता केमिकलजवळ ४८५ मीटरचा उड्डाणपूल बांधला आहे. महापे येथे ठाणेकडून बेलापूरकडे जाण्यासाठी ४८५ मीटरचा तीन मार्गिका असणारा भुयारी मार्ग बांधला आहे. या दोन उड्डाणपूल व भुयारी मार्गासाठी एमएमआरडीएने १६६ कोटी रुपये खर्च केला आहे.

सविस्तर वाचा : भाजीपाल्यानंतर आता कडधान्ये, डाळींचे दर झाले दुप्पट, ताटात वाढायचे तरी काय? गृहिणींपुढचा प्रश्‍न

हा भुयारी मार्ग पाण्याच्या पातळीपेक्षा अधिक खोल असल्याने येथे नेहमी ओलावा असतो. परिणामी, रस्त्यावर शेवाळे झाल्याने रस्ता निसरडा झाला आहे. याशिवाय, सिमेंटच्या रस्त्यांमधील सांध्यांना तडे गेले असून, त्यामध्ये खड्डे पडत आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांसाठी भुयारी मार्गातील प्रवास जीवघेणा झाला आहे. दरम्यान, मार्गाचे पुन्हा डागडुजीचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. 

महत्त्वाची बातमी : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतिर्थावर नाही

महापे भुयारी मार्ग, घणसोली व सविता केमिकल येथील उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएने केलेले आहे. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पालिकेकडे हस्तांतरित केले आहे; मात्र यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्ष देखभाल व दुरुस्ती एमएमआरडीएने करायची आहे.
- संजय देसाई, कार्यकारी अंभियता, पालिका

भुयारी मार्गात वर्षभर ओलावा असतो. रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होतात. पाणी साचू नये यासाठी नेहमीच खोदकाम करत डागडुजी सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीही होते.
- चाँद शेख, वाहनचालक

अधिक वाचा : गड्या आपली सायकलच बरी; रायगडमध्ये विक्रीत १५ टक्क्यांनी वाढ

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidents has increased at Mahape Subway due algae on road