प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना न्याय मिळणार : मंदा म्हात्रे

सुजित गायकवाड
Wednesday, 21 October 2020

निक प्रकल्पग्रस्तांना डावलून नवी मुंबई बाहेरच्या कंत्राटदारांना ठेका देण्यावरून बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा महापालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराला उद्यान विभागाची कामे दिल्याने म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. या कामांचे कंत्राट स्थानिक ठेकेदारांना देण्याबाबत आणि साफसफाईच्या 96 कामांचे कंत्राटही जुन्या स्थानिक कंत्राटदारांना देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हात्रे यांना दिले. 

नवी मुंबई : स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून नवी मुंबई बाहेरच्या कंत्राटदारांना ठेका देण्यावरून बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा महापालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराला उद्यान विभागाची कामे दिल्याने म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. या कामांचे कंत्राट स्थानिक ठेकेदारांना देण्याबाबत आणि साफसफाईच्या 96 कामांचे कंत्राटही जुन्या स्थानिक कंत्राटदारांना देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हात्रे यांना दिले. 

महापालिकेच्या उद्यान विभागातील कामकाजाबाबत आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत आज म्हात्रे यांनी बांगर यांची भेट घेतली. उद्यान विभागाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार पाहता ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे परवाने जप्त करण्याची मागणीही म्हात्रे यांनी केली. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे. अशी कामे आम्ही यापुढे खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा म्हात्रे यांनी या बैठकीदरम्यान दिला. 

वाचा सविस्तर : नवी मुंबई महापालिकेत बदल्यांबाबत नियमावली नाही; माहिती अधिकार अर्जावर दिले उत्तर

काम न करताच बिले उकळणाऱ्या कंत्राटदारावर अद्याप कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित करून म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी दोन्ही कंत्राटेही स्थानिकांना देण्याबाबत प्रथम प्राधान्य असेल, असे बांगर यांनी स्पष्ट केले. उद्यान विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समिती नेमली असून, लवकरच त्याचा अहवाल सादर करणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. याशिवाय, दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही बांगर यांनी दिले. 

वाचा हेही : निकृष्ट हातमोजे पुरवणारा काळ्या यादीत; 'एस्के सर्जिकल'वर नवी मुंबई पालिकेची कारवाई

नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा खूप मोठा हात असताना त्यांनाच डावलून देशोधडीला लावण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे. प्रकल्पग्रस्तांमुळेच महापालिकेला स्वच्छतेचे पुरस्कार मिळालेले आहे. त्यांना नामशेष करण्याचा डाव महापालिका आखत आहे; परंतु हे कदापि सहन करणार नाही. 
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner of NMMC has given assurance of Justice to Local Contractor