निकृष्ट हातमोजे पुरवणारा काळ्या यादीत; "एस्के सर्जिकल'वर नवी मुंबई पालिकेची कारवाई

निकृष्ट हातमोजे पुरवणारा काळ्या यादीत; "एस्के सर्जिकल'वर नवी मुंबई पालिकेची कारवाई
निकृष्ट हातमोजे पुरवणारा काळ्या यादीत; "एस्के सर्जिकल'वर नवी मुंबई पालिकेची कारवाई

नवी मुंबई : कोव्हिडच्या काळात रुग्णांना हाताळण्यासाठी महापालिका अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे हातमोजे पुरवणाऱ्या एस्के सर्जिकल या कंत्राटदाराला नवी मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे बोगस कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. "सकाळ'ने याबाबत बातमी प्रसिद्ध करून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. 

महापालिकेकडून कोव्हिड- 19 रुग्णांवर उपचार करताना वापरण्यासाठी आवश्‍यक असलेले रबरी हातमोजे पुरवठा करण्याचे कंत्राट मे. एस्के सर्जिकल यांना देण्यात आले होते. पालिकेने दिलेल्या कंत्राटानुसार टप्प्या-टप्प्याने सुमारे दहा हजार रबरी हातमोजे आरोग्य विभागाला पुरवठा करायचे होते. काही दिवस हातमोजांचा पुरवठा झाल्यानंतर हे हातमोजे खराब असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आले. खराब दर्जाचे हातमोज्यांचा पुरवठा केल्याने काळ्या यादीत का टाकले जाऊ नये, याबाबत कारणे द्या नोटीस एस्के सर्जीकल यांना आयुक्त बांगर यांनी बजावली होती. पालिकेने बजावलेल्या नोटिशीला एस्के सर्जिकल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात नजरचुकीने निकृष्ट दर्जाची हातमोजे पालिकेला पुरवठा झाल्याची चूक कबूल केली. निकृष्ट दर्जाचे हातमोजे पुरवठा केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने एस्के सर्जिकल यांना पुढील तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या तीन वर्षांत एस्के सर्जिकल यांना पालिकेच्या कोणत्याच निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच पालिकाही सहभागी करून घेणार नाही. 

साहित्य पुरवठा सुरूच 
नवी मुंबई महापालिका प्रशासनाला खराब दर्जाचे हातमोजे पुरवठा केल्याप्रकरणी मे. एस्के सर्जिकल यांना काळ्या यादीत टाकले असले, तरी त्यांच्यामार्फत आरोग्य विभागातील इतर वैद्यकीय उपकरणे व साहित्यपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्याआधीच्या तारखा आणि अटींनुसार हे कंत्राट सुरू असल्याने सर्वच कामे थांबवता येणार नाहीत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले; मात्र एकदा निकृष्ट दर्जाचे साहित्य सापडल्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा पालिकेला पडताळून घ्यावा लागणार आहे. 

महापालिकेला निकृष्ट दर्जाचे हातमोजे पुरवठा केल्याप्रकरणी मे. एस्के सर्जिकल, ठाणे यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यासोबत खराब दर्जाचे हातमोजे पुरवठा करताना साहित्याचा दर्जा न तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. कोणाचीही हयगय केली जाणार नाही. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

कॉंग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
कोव्हीडच्या काळात महापालिका प्रशासनाला फसवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितासोबत खेळणाऱ्या कंत्राटदारावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी नवी मुंबईचे कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली आहे.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com