कामात दिरंगाई खपवून नाही घेणार; आयुक्त बांगर यांचे आरोग्य विभागाला दमवजा सूचना

सुजित गायकवाड
Friday, 2 October 2020

कोरोनाकाळात रुग्णांना असुविधा होऊ नयेत, म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कान टोचले आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये रोजच्या रोज रुग्ण भरती होत आहेत. प्रशासकीय दिरंगाईचा फटका रुग्णांना बसता कामा नये, अशा भाषेत त्यांनी सज्जड दमवजा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एखाद्या गोष्टीचे काम झाले तर इतर पर्याय शोधा. नुसते थंड बसून राहू नका, असेही बांगर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

नवी मुंबई : कोरोनाकाळात रुग्णांना असुविधा होऊ नयेत, म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कान टोचले आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये रोजच्या रोज रुग्ण भरती होत आहेत. प्रशासकीय दिरंगाईचा फटका रुग्णांना बसता कामा नये, अशा भाषेत त्यांनी सज्जड दमवजा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एखाद्या गोष्टीचे काम झाले तर इतर पर्याय शोधा. नुसते थंड बसून राहू नका, असेही बांगर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

कोव्हिड 19 साथरोग विरोधातील लढाई अत्यंत जबाबदारीने लढली जात असताना आवश्‍यक आरोग्य सेवा-सुविधांची परिपूर्ती विहित वेळेत होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन अभिजित बांगर यांनी गुरुवारी आरोग्य विभागाच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते. कोव्हिड संबंधित सर्व बाबींचा या बैठकीत बांगर यांनी बारकाईने आढावा घेतला.

अधिक वाचा : नवी मुंबई महापालिकेची अशीही गांधीगिरी; मास्क न लावणार्!यांना कारवाईऐवजी गुलाबाचे फूल

सध्या कामात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी आयुक्तांनी व्यक्त केली. आरोग्य विभाग सध्या कोव्हिडच्या परिस्थितीत तत्परच राहिला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची दफ्तर दिरंगाई चालणार नाही, असे त्यांनी बैठकीस उपस्थितीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट केले. 

वैद्यकीय सुविधांमध्ये विशेषत्वाने औषध उपलब्धतेकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. खरेदी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. कोव्हिड काळात तातडीची गरज लक्षात घेऊन कामात सुधारणा करावी, असे आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्वांना निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (2) यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर काटेकोरपणे लक्ष द्यावे. आरोग्य विभागाच्या कामाचा नियमित आढावा घ्यावा आणि कामे विहित वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. 

हेही वाचा : नवी मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर; पुन्हा कठोर नियम, आयुक्तांचे आदेश

ठेकेदारांना काळ्या यादीत टाका 
आरोग्य विभागाकडून कंत्राटदारांमार्फत उपलब्ध होणारे साहित्य, उपकरणे यांच्या दर्जा आणि गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड असू नये, गुणवत्ताहीन साहित्य देणाऱ्या पुरवठादाराला काळ्या यादीत टाकण्याचे; तसेच आवश्‍यकता भासल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरेदी केल्या जाणाऱ्या साहित्य व उपकरणांच्या किमती या बाजारभावाशी सुसंगत असण्याकडेही काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना बांगर यांनी या वेळी दिल्या. 

आणखी वाचा : पनवेलमधील ६२ वर्षीय महिलेने ४ रुग्णांना दिले जीवदान

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner of NMMC has instructed to health department about delay work