पनवेलमधील 62 वर्षीय महिलेने 4 रुग्णांना दिले जीवदान

पनवेलमधील 62 वर्षीय महिलेने 4 रुग्णांना दिले जीवदान

मुंबई, 02:  पनवेलमधील एका 62 वर्षीय महिलेने मृत्यूनंतर केलेल्या अवयव दानामुळे 4 रुग्णांना जीवदान देण्यात मदत झाली आहे. या महिलेला गंभीर अवस्थेत नवी मुंबईतील रुग्णालयात 26 सप्टेंबर या दिवशी दाखल करण्यात आले होते. तिची तपासणी केल्यावर तिला ‘इंट्रा क्रॅनियल हेमोरॅज’ असल्याचे निदान झाले. सर्व प्रकारच्या उपचारपद्धती आणि प्रयत्न करूनही ती बरी होऊ शकली नाही आणि क्लिनिकल प्रोटोकॉलनुसार, 29 सप्टेंबर रोजी तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना अवयवदानाबद्दल माहिती दिली. त्या कुटुंबाने मोठ्या धैर्याने त्या महिलेच्या अवयवांचे दान करण्यास सहमती दर्शवली. या कामी ‘झेडटीसीसी’ चेही सहकार्य घेण्याचे ठरवण्यात आले. हे मुंबईतील यावर्षीचे 26 वे अवयव दान आहे.

मृत देणगीदाराकडून यकृत, मूत्रपिंडे आणि फुफ्फुस हे अवयव घेण्यात आले. कोल्हापूर येथील एका 39 वर्षांच्या व्यक्तीवर यातील यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्याला शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार होता. मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात करण्यात आले.

मृत महिलेच्या फुफ्फुसांसाठी महाराष्ट्रात योग्य प्राप्तकर्ता आढळला नाही. त्यामुळे त्याबाबत ‘झेडटीसीसी’ ची मदत घेण्यात आली. त्या माध्यमातून चेन्नईमध्ये एक योग्य प्राप्तकर्ता सापडला. फुफ्फुस चेन्नईला पाठवण्यासाठी बेलापूरच्या अपोलो रुग्णालयापासुन मुंबई विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’चे नियोजन करण्यात आले. 30 किलोमीटर्सचे अंतर 38 मिनिटांत पार पाडून ते फुफ्फुस विमानाने चेन्नईला पाठवण्यात आले. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयामधील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. त्या एका दिवसात चेन्नईच्या अपोलो रुग्णालयामध्ये झालेली फुफ्फुस प्रत्यारोपणाची ही दुसरी शस्त्रक्रिया होती.  नवी मुंबई आणि सूरत येथून पाठवण्यात आलेल्या दोन फुफ्फुसांमुळे चेन्नईतील 2 वेगवेगळ्या रूग्णांना जीवदान मिळाले.

"अवयवदानाचे मोठे औदार्य दाखविल्याबद्दल आम्ही त्या महिलेच्या कुटुंबाचे आणि झेडटीसीसीचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे अवयवांची प्रतीक्षा करणाऱ्या रूग्णांना प्रत्यक्ष जीवनाचे दान मिळाले. आमच्या हॉस्पिटलमधील दात्याकडून मिळालेले एक यकृत आणि दोन मूत्रपिंडे या तीन अवयवांचे प्रत्यारोपण आम्ही एकाच दिवसात केले. संबंधित महिलेच्या कुटुंबाने आपली प्रिय व्यक्ती गमावली, मात्र तिने इतर चार जणांना नवे आयुष्य दिले." - डॉ. अतुल अदानिया, वैद्यकीय सेवा संचालक , अपोलो रुग्णालय

women from panvel saved life of 4 people by donating her organs

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com