गणेशोत्सवात स्‍वस्‍त फळांचा गोडवा... रायगड जिल्ह्यात 280 टन फळांची आवक, किमतीमध्ये घसरण

गणेशोत्सवात स्‍वस्‍त फळांचा गोडवा
गणेशोत्सवात स्‍वस्‍त फळांचा गोडवा

महाड : गणेशोत्सव काळात फळांची मागणी वाढू लागल्याने फळांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आले आहेत. सर्व प्रकारची फळे बाजारात उपलब्ध झाली असून जिल्ह्यात 280 टन फळांची आवक झाली आहे. फळांच्या अनेक दुकानांमध्ये आणि गाड्यांवर आता स्वस्त दरात असलेल्या फळांची मोठ्याने ओरडून फळविक्रेते विक्री करताना दिसत आहेत. 

लॉकडाऊननंतर श्रावण महिन्यात फळांना चांगल्याप्रकारे भाव आलेला होता. श्रावण महिन्यात वेगवेगळे व्रतवैकल्ये असल्याने आणि लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने फळांचे भाव वधारलेले होते. आता गणेशोत्सवात गणपती व गौरीला प्रसादासाठी फळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पाच फळांचा नैवेद्य दाखवला जातो. याच काळात हरितालिका व गौरीचे उपवासही केले जात असल्याने फळांची मागणी वाढत असते. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठा फळांनी गजबजलेल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये पाच फळांची मागणी वाढल्याने दुकानदारांनी 50 रुपयांना पाच फळांची ऑफर सुरू केली आहे.

सध्या बाजारामध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, सिताफळे, नासपती पपई व केळी या फळांना विशेष मागणी आहे. त्यांची आवकही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सफरचंद वगळता अन्य फळांचे दर आवाक्‍यात असल्याने फळे खरेदी वाढली आहे. गणेशोत्सवामध्ये उत्सव संपेपर्यंत मांसाहार वर्ज्य असल्याने फळांकडे ग्राहक वळत आहेत. त्यामुळे फळांच्या किमतीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे. 

महाडच्या बाजारपेठेमध्ये मोठे पेरू व डाळींब शंभर रुपयाला दीड किलो विकली जात आहेत. मध्यम डाळिंबाचे दर 50 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. काही ठिकाणी केळ्यांचे भाव 30 रुपये डझनवर आलेले आहेत. मोसंबी 60 रुपये किलोने विकली जात आहे. फळांच्या भावामध्ये ही घसरण झाल्याने ग्राहक फळे मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. तर पावसाळ्यात फळे खराब होऊ नये म्हणून विक्रेते आपला माल मोठमोठ्याने ओरडून संपवण्याच्या मार्ग अवलंबत आहेत. 

फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे आणि सणांमुळे मागणी वाढली आहे. यंदा भाव आटोक्‍यात आहेत. पुरवठाही सुरळीत आहे. 
- आसिफ खान, फळविक्रेता 

सणाच्या दिवसात फळे स्वस्त झाली ही चांगली बाब आहे. फळे स्वस्त असल्याने मनसोक्त खाता येतील. शिवाय, पाच फळेही एकत्र मिळत आहेत. 
- व्ही. जी. जोशी, ग्राहक 

फळांचे दर 
डाळींब : 50 - 60 
केळी : 30 (डझन) 
सिताफळे : 50-70 
मोसंबी : 60 
सफरचंद : 160 - 200 
मोठे पेरू : 100 (दीड किलो) 
मोठी डाळींब - 100 (दीड किलो) 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com