esakal | स्वच्छतेत नवी मुंबई राज्यात एक नंबर, फाईव्ह स्टार रेटींग्ज असणारे राज्यातील एकमेव शहर
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेत नवी मुंबई राज्यात एक नंबर, फाईव्ह स्टार रेटींग्ज असणारे राज्यातील एकमेव शहर

स्वच्छतेत पुन्हा एकदा नवी मुंबई शहराने राज्यातील पहिले शहर असल्याचा बहुमान पटकावला आहे

स्वच्छतेत नवी मुंबई राज्यात एक नंबर, फाईव्ह स्टार रेटींग्ज असणारे राज्यातील एकमेव शहर

sakal_logo
By
सुजित गायकवाड

नवी मुंबई : स्वच्छतेत पुन्हा एकदा नवी मुंबई शहराने राज्यातील पहिले शहर असल्याचा बहुमान पटकावला आहे. तर देशात नवी मुंबई हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. तब्बल चार हजार शहरांमधून नवी मुंबईने देशात तिसरा क्रमांक पटकावल्याचे आज जाहीर करण्यात आले. तसेच कचरा मुक्त शहरांच्या फाईव्ह स्टार रेटींग्ज प्राप्त करणाऱ्या देशातील सहा शहरांमध्ये राज्यातील नवी मुंबई हे एकमेव शहर झाले आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या सोहळ्यात जाहीर करण्यात आला. केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिल्ली येथून हा निकाल जाहीर करीत विजेत्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात मंत्रालयातून राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, माजी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, तत्कालिन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अतिरीक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आदी अधिकारी सहभागी झाले होते. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षकांनी महापालिका क्षेत्रातील स्थळांना कोणतीही पूर्व कल्पना देता अचानक भेटी देऊन पाहणी केली होती.

पाहणीदरम्यान नागरीकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून स्वच्छतेबाबत अभिप्राय जाणून घेतला होता. तसेच नागरीकांनी स्वच्छता ऍपवर दिलेल्या अभिप्रायाची नोंदही घेण्यात आली होती. टोलफ्री क्रमांकावरून नागरीकांना फोन करून त्यांचे अभिप्राय जाणून घेतले होते.

महत्त्वाची बातमी - ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले

या प्रकारात शहराला मिळालेल्या गुणांच्या आधारावर देशात तिसरा क्रमांक पटकावता आला आहे. घरात निर्माण होणाऱ्या ओला व सुका कचरा वर्गीकरणावर याआधीपासूनच महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. वाहतूकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी तंत्रप्रणाली राबविण्यात नवी मुंबई आघाडीवर राहीली आहे. तुर्भे येथे कचराभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विघटन, खत प्रकल्प, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स आणि फ्युएल प्लेट्‌स तयार केल्या जात आहेत. बांधकाम व पाडकामातून निघणाऱ्या डेब्रीजवर प्रक्रीया करणारे सी ऍण्ड डी वेस्ट प्रकल्पही कार्यान्वित केल्याचा फायदा शहराला स्पर्धेत झाला आहे.

त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, उद्योग समुह यांनी त्यांच्या आवारातच कचऱ्यावर प्रक्रीया करून कचऱ्याची विल्टेवाट करून घेण्याची शिस्त पालिकेने लावली. नवी मुंबईच्या सर्व शाळांमध्ये खतप्रकल्प सुरू केले. झोपडपट्टी भागात झिरो वेस्ट स्लम मॉडेल हा पॅटर्न राबवण्यात आला. दिघातील रामनगर येथे हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला.

जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्याठिकाणी फुलवण्यात आलेल्या निसर्गोउद्यानात साकारलेला स्वच्छता पार्क ही अभिनव संकल्पना एक लाखाहून अधिक नागरीकांनी भेट देऊन यशस्वी केली आहे. शहरातील साफ-सफाई वेळेत व्हावी याकरीता महापालिकेने "स्मार्ट वॉच' संकल्पनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवल्याचा फायदा महापालिकेला झाला.

विविध उपक्रमांची जोड

स्वच्छतेचे नियम सर्वांच्या अंगवळणी पडण्यासाठी महापालिकेने या मोहीमेत लोकसहभाग मोठ्या प्रमणात स्विकारला होता. मोहीमेला व्यापक रुप प्राप्त व्हावे याकरीता विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातून कार्यक्रमे व शिबीरे घेण्यात आली. विविध विभागांमध्ये सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्समध्ये उपक्रम राबवण्यात आले.

महत्त्वाची बातमी - मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं

विद्यार्थ्यांमध्ये संदेश रुजवण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध, वकृत्व, शॉर्टफिल्म्स, गणेशोत्सव, स्वच्छ सोसायटी पुरस्कार अशा स्पर्धा राबवण्यात आल्या. रॅली आणि स्वच्छता स्पर्धा राबवून नागरीकांचा सक्रीया सहभाग नोंदवून घेतला. घरातून निघणाऱ्या जून्या चप्पलांचा कचरा मार्गी लावण्यासाठी जून्या चप्पल व बूटांचा संग्रह करून त्या पूर्नवापरात आणण्यासाठी ग्रीन सोल ही संकल्पना राबवली. कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, टॉकलेट्‌सची आवरणे, पिशव्या आदींचा वापर करून "प्लास्टिमॅन' साकारला. 

( संपादन - सुमित बागुल ) 

navi mumbai bags bags third position in swacha bharat abhiyan cleanest city in maharashtra :

loading image