नाखवांसाठी खूशखबर : या ठिकाणी लवकरच मत्स्यजेटी उभारणार; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रस्ताव देण्याचे आदेश

आगरदांडा जेटी
आगरदांडा जेटी

मुरूड : आगरदांडा बंदरात मच्छी विकण्यासाठी कोळी समाजाला जेट्टी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी मुरूडसह राजपुरी, दिघी, एकदरा या परिसरातील सर्व नाखवा मंडळींनी मुरूड तालुका नाखवा संघाचे समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी आंदोलन करून सरकारचे लक्ष्य वेधले होते. त्याची खासदार सुनील तटकरे यांनी दखल घेत मत्स्यविकास राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कायमस्वरूपी मत्स्यजेटी उभारणीसाठी प्रस्ताव आणि तेथे सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश राज्यमंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

सध्याच्या कोव्हिड परिस्थितीमुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारी केल्यानंतर मासे विक्रीसाठी, तसेच मत्स्य प्रक्रियेसाठी ससून डॉक येथे जाता येत नाही. मच्छीमारांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्यांची पर्यायी व्यवस्था व्हावी म्हणून आगरदांडा बंदरात तातडीने तात्पुरत्या स्वरूपात नवीन जेटी बांधून मिळावी, या मागणीसाठी कोळी बांधवांनी मोठे सागरी आंदोलनही छेडले होते. या आंदोलनाची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आणि मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी मत्स्यविकास राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या दालनात नुकतीच सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. 

सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. आगरदांडा येथे सध्या अस्तिवात असलेल्या प्रवासी जेटीवर तात्पुरती प्लॉटिंग पद्धतीने सुविधेचा मार्ग काढावा आणि मुरूड-आगरदांडा परिसरात सोयीस्कर जागी कायमस्वरूपी जेटी उभारणीचा प्रस्ताव तयार करावा. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आणि मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त पाहणी दौरा करून कायमस्वरूपी मत्स्यजेटी उभारणीसाठी जागा निश्‍चित करून तसा प्रस्ताव पाठवावा, असे निर्देशही राज्यमंत्री भरणे यांनी दिले. 
या बैठकीस पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी, मच्छीमार संघटनेचे प्रकाश सरपाटील, लक्ष्मण मेंदाडकर, जय भवानी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र गार्डी, उपाध्यक्ष ध्रुवलोदी उपस्थित होते.

पारंपरिक मच्छीमारीसाठी सहकार्य आवश्‍यक 
आगरदांडा येथे जेटी असणे अनिवार्य आहे. पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करून उपजिविका करणाऱ्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी या ठिकाणी जेटी खूप आवश्‍यक आहे. या परिसरातील पारंपरिक मच्छीमार टिकवून राहावा, यासाठी त्यांना सुविधा व सहकार्य देण्यात यावे, असे सुनील तटकरे यांनी मच्छीमारांची बाजू मांडताना सांगितले. 

मिळणारे फायदे 
* आगरदांडा जेटी कायमस्वरूपी मच्छीमारांना मिळाल्यास मुंबईकडे जाण्यासाठी लागणारे 200 किलोमीटरचे अंतर वाचू शकेल. यामुळे 
वेळ व इंधनाची बचत होईल. 
* इंदापूर ते आगरदांडा चौपदरी रस्ता झाल्याने मुंबईसह पुणे-बंगळूरु येथे सकाळची ताजी मासळी व्यापाऱ्यांना नेणे शक्‍य होईल. 
* मासळीवर करावी लागणारी प्रक्रिया स्थानिक पातळीवर करता येईल. त्यामुळे वाहतुकीचा त्रास कमी होईल. 
* दिघी बंदरात इंदापूरमार्गे दळणवळणाची यंत्रणा वाढल्याने मच्छीमारांसह अन्य उद्योगधंद्यांना चालना मिळेल. 
* साधारण 25 कोटींची वार्षिक उलाढाल होऊ शकेल. 
* पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरेल. 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com