'निश्‍चय केला, नंबर पहिला' : सर्वोत्तम स्वच्छ शहरासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

सुजित गायकवाड
Saturday, 3 October 2020

तिसऱ्या क्रमांकावरून गरूड झेप घेऊन देशात सर्वांत स्वच्छ शहर होण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई शहराने आजपासून तयारी सुरू केली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी 'निश्‍चय केला, नंबर पहिला' या घोषवाक्‍यातून पालिकेने स्वच्छतेचा श्री गणेशा केला. स्वच्छता ही चळवळ झाली, तरच त्यात सातत्य टिकते. त्यासाठी नवी मुंबईकरांच्या उत्स्फूर्त सहभागाची गरज आहे, असे आवाहन बांगर यांनी नागरिकांना केले. 

नवी मुंबई : तिसऱ्या क्रमांकावरून गरूड झेप घेऊन देशात सर्वांत स्वच्छ शहर होण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई शहराने आजपासून तयारी सुरू केली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी 'निश्‍चय केला, नंबर पहिला' या घोषवाक्‍यातून पालिकेने स्वच्छतेचा श्री गणेशा केला. स्वच्छता ही चळवळ झाली, तरच त्यात सातत्य टिकते. त्यासाठी नवी मुंबईकरांच्या उत्स्फूर्त सहभागाची गरज आहे, असे आवाहन बांगर यांनी नागरिकांना केले. 

कोव्हिड 19 ला सामोरे जात असताना नवी मुंबईने स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारण्याचे मनोधैर्य बांधले आहे. महापालिका मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून बांगर यांनी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करताना नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : कामात दिरंगाई खपवून नाही घेणार; आयुक्त बांगर यांचे आरोग्य विभागाला दमवजा सूचना 

एखादे यश मिळवण्यासाठी परिश्रम आवश्‍यक असते; मात्र मिळालेला नंबर टिकवण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी आत्यंतिक परिश्रमाची आवश्‍यकता असते. यासाठी सज्ज होऊन स्वच्छ शहरांमध्ये असलेला देशातील तिसरा क्रमांक यावर्षी 'निश्‍चय केला - नंबर पहिला' हे लक्ष्य व 'क्‍लीनर टूडे - बेटर टुमारो' असे ध्येय नजरेसमोर ठेवून गाठायचे आहे, अशा शब्दांत बांगर यांनी नवी मुंबईकरांना आवाहन केले. नवी मुंबईने इतरांनी अनुकरण कराव्यात अशा अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी राबवल्याने आपण नेहमीच अग्रेसर राहिलो आहोत. याचे श्रेय प्रामुख्याने स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक आणि शहर स्वच्छतेचे काम नियमितपणे करणारे सफाई कर्मचाऱ्यांचे असल्याचे सांगत बांगर यांनी स्वच्छताकार्यात सक्रिय सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांचा विशेष उल्लेख केला. 

वाचा हेही : नवी मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर; पुन्हा कठोर नियम, आयुक्तांचे आदेश

नागरिकांकडून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया गरजेची 
शहराचा देशात पहिला नंबर येण्यासाठी एक म्हणजे कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी कचऱ्याचे ओला, सुका आणि घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे. दुसरे म्हणजे ओल्या कचऱ्यावर नागरिकांकडून प्रक्रिया केली जाणे गरजेचे आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 

'गाठूया शिखर स्वच्छतेचे' 
या निमित्ताने "सर्वांत स्वच्छ, नवी मुंबई सर्वांत स्वच्छ - या करूया आपण मिळूनी या सुंदर स्वप्नाला सत्य' अशा शब्दांतली स्वच्छतेची सुरेल जिंगल प्रकाशित करण्यात आली. त्याचप्रमाणे 'गाठूया शिखर स्वच्छतेचे' हे पथनाट्य सप्तश्री कला व सामाजिक संस्था यांच्या कलावंतानी सादर करत स्वच्छतेविषयी नवी मुंबई महानगरपालिका करत असलेल्या कामांची मनोरंजक स्वरूपात माहिती देत प्रबोधन केले. 

आणखी वाचा : पनवेलमधील ६२ वर्षीय महिलेने ४ रुग्णांना दिले जीवदान

मोहिमेची चष्मा व चरखा प्रतिकचिन्हे 
घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई महानगरपालिकेने 'रिड्युस, रियूज आणि रिसायकल' या 'थ्री - आर' वर लक्ष केंद्रित केले आहे. कचऱ्याचा पुनर्वापर उपक्रमाचा एक भाग म्हणून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू अंतर्गत जुन्या टाकाऊ सायकलींच्या विविध भागांचा वापर करून बनवलेल्या महात्मा गांधीजींच्या चष्मा आणि चरखा या प्रतिकचिन्हांचे उद्‌घाटन बांगर यांच्या हस्ते केले. ही प्रतिकचिन्हे महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवली आहेत.

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMMC's has decided new goal 'Number 1 clean city of India'