हॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण अंतराळात; टॉम क्रूझचा विक्रम होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 10 मे 2020

टॉम क्रूझ हा जगातील पहिला अभिनेता असणार आहे जो अंतराळात जाऊन चित्रीकरण करणार असून हा पहिलाच असा चित्रपट असणार आहे. कोरोनाचा धोका नसल्यामुळे हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोनामुळे भारतातील चित्रपटांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. अशातच हॉलीवूडने एक पाऊल पुढे टाकले आहे. सुप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण अंतराळात करणार आहे. कोरोनाचा धोका नसल्यामुळे हा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

हे वाचा : कॉंग्रेसच्या साहसवादाला विरोध 

अंतराळात चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी नासासोबत करार केला आहे. टॉम क्रूझ आणि एलेन मस्कची कंपनी स्पेस एक्‍स नासासोबत मिळून एका चित्रपटावर काम करत आहेत. टॉमच्या चित्रपटाचे चित्रीकरण जर अंतराळात झाले तर अंतराळात चित्रित झालेला हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. 
नासाचे जिम ब्रिडेंस्टाइन यांनी ट्विट करत या बातमीला दुजोरा दिला आहे. या ट्‌विटमध्ये जिम म्हणाले आहेत की, "नासा टॉम क्रूझ सोबत त्यांच्या पुढील चित्रपटाचे चित्रीकरण अंतराळात करण्यासाठी उत्सुक आहे. नासासाठी हा अनुभव नवीनच असणार आहे. आम्हाला लोकप्रिय माध्यमांची आवश्‍यकता आहे, हे आजच्या अभियंते आणि वैज्ञानिकांच्या नव्या पिढीला प्रेरणा देतील. आणि नासाची ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होईल.' 

हे वाचा : नोकरी मिळत नाही...पण घाबरू नका... 

हा चित्रपट टॉमचाच "मिशन इम्पॉसिबल' चित्रपटाचा दुसरा भाग असणार आहे. हा एक ऍक्‍शन ऍडव्हेंचर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण चक्क अंतराळात करण्याचा टॉमचा विचार आहे. यासंदर्भात एलेन मस्कची कंपनी स्पेस एक्‍स यांची नासासोबत चर्चा सुरू आहे. 
याबाबत ऑस्कर अकॅडमीचे सदस्य व चित्रपट तंत्रज्ञ उज्ज्वल निरगुडकर म्हणाले की, "अंतराळात चित्रीकरण करणे हे एक मोठे तांत्रिक आव्हान आहे. त्यासाठी विशिष्ट पद्धतीचे वेगळे तंत्रज्ञान कॅमेऱ्यासाठी वापरले जाईल. तेथून प्रतिमा पृथ्वीवर पोस्ट प्रॉडक्‍शन हाऊसमध्ये उपग्रहामार्फत पाठवली जाईल. कोरोना विषाणूच्या धोक्‍यामुळे एका नव्या तंत्रज्ञानाचा जन्म होत आहे, याचे एक चित्रपट तंत्रज्ञ म्हणून मी स्वागत करतो.' 
 
नवीन आव्हान 
टॉम क्रूझ हा जगातील पहिला अभिनेता असणार आहे जो अंतराळात जाऊन चित्रीकरण करणार असून हा पहिलाच असा चित्रपट असणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे सर्व प्लॅन्स प्राथमिक टप्प्यात आहेत. चित्रपटाचे नाव काय असणार, चित्रपटात टॉमसोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र हवाविरहित अंतराळात चित्रीकरण करणे हे एक आव्हान टॉम क्रूझसाठी देखील नवीनच असणार असणार आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Hollywood has taken a step forward. Well known actor Tom Cruise is going to shoot his upcoming film in space