शिवभक्‍तांनी प्रवास करताना जरा सांभाळून...

सकाळ वृत्‍तसेवा
Wednesday, 19 February 2020

राजबंदर जेट्टीचा स्लॅब कोसळला; महाशिवरात्रीसाठी येणाऱ्यांची गैरसोय 

उरण : उरण परिसरातील मोरा समुद्रमार्गे आणि पनवेल परिसरातील न्हावा समुद्रमार्गे घारापुरी लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या ५० वर्षे जुन्या राजबंदर जेट्टीचा स्लॅब आणि जेट्टीखालील अनेक ठिकाणचे प्लास्टर आठवडाभरापासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घारापुरीत महाशिवरात्रीनिमित्ताने येणाऱ्या शिवभक्‍तांचा जीव धोक्‍यात आला आहे. याकडे मुंबई मेरिटाईम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने येणाऱ्या ७० ते ८० हजार शिवभक्तांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे.

हे पण वाचा ः कर्नाळा सहकारी बँक घोटाळा; विवेक पाटलांसह ७६ जणांवर गुन्हा दाखल ...

नवी मुंबई, उरण, न्हावा, पनवेल, अलिबाग येथून घारापुरी बेटावर येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांसाठी सुमारे ५० वर्षे जुनी असलेली राजबंदर ही एकमेव जेट्टी आहे. पर्यटकांबरोबरच बेटावर वसलेले राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावातील नागरिकही बाजारहाट आणि समुद्रमार्गे ये-जा करण्यासाठी या जेट्टीचा वापर करतात. महाशिवरात्रीनिमित्ताने या ठिकाणी  येणाऱ्या देशातील; तसेच परदेशातील पर्यटकांमुळे या उत्सवाला आंतरराष्ट्रीय महाशिवरात्री म्हणूनही ओळखले जाते.

हे पण वाचा ः गिधाडांमुळे बागायदारांवर संक्रांत 

राजबंदर जेट्टीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी लेखी मागणी दरवर्षी मुंबई मेरिटाईम बोर्डाकडे केली जाते. मात्र दुरुस्तीसाठी बंदर विभागाकडे निधी नसल्याची कारणे देत दरवर्षी बंदर विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी केला आहे. 

मेरिटाईम विभागाचे दुर्लक्ष

स्लॅब कोसळल्यानंतर मेरिटाईम विभागाचे सहायक अभियंता पी. एल. बागुल यांनी पाहणी केली. तसेच त्याला तात्पुरता टेकू लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे.  शिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर येणाऱ्या शिवभक्तांची होणारी गैरसोय तातडीने दूर करण्यासाठी बंदर विभागाकडून कोणती उपाययोजना केली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘Shiva’ devotees risky travel