
व्यावसायिकाला मागितली १० लाखांची खंडणी; दोघांना अटक, दोघे फरार
मुंबई : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला १० लाखांची खंडणी (ransom) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईच्या सहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचतारांकित हाॅटेलमध्ये घडली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांचा शोध घेण्यात येत आहे. (10 lakh ransom demanded from businessman)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरात राहणारे व्यापारी सहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचतारांकित हाॅटेलमध्ये थांबले होते. यावेळी इरफान रमजान शेख व महिला जेवण करण्याच्या बहाण्याने पंचतारांकित हाॅटेलमध्ये शिरले. काही वेळांनी इरफान हा फरार महिला व व्यावसायिकाला एकट सोडून खोलीबाहेर पडला.
यानंतर महिलेने एकट्या व्यावसायिकासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात इतर आरोपी खोलीत आले. महिलेच्या मदतीने आरोपींनी व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल न करण्यासाठी व्यावसायिकाला १० लाखांची खंडणी (ransom) मागितली.
मात्र, व्यावसायिकाने आरोपींना खंडणी देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी व्यावसायिकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी इरफान रमजान शेख, पराग अरुण भुई या दोघांना अटक केली आहे. तसेच फरार महिलेसह दोन जणांचा शोध घेण्यात येत आहे.