महागृहनिर्माण प्रकल्पासाठी 103 झाडांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

वाशी येथे सिडकोतर्फे महागृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास अडथळा ठरत असणारी 103 झाडे तोडण्याची परवानगी सिडकोच्या उद्यान विभागाकडे मागण्यात आली आहे.

नवी मुंबई : वाशी येथे सिडकोतर्फे महागृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास अडथळा ठरत असणारी 103 झाडे तोडण्याची परवानगी सिडकोच्या उद्यान विभागाकडे मागण्यात आली आहे. त्याविरोधात लेखी हरकती नोंदवण्यासाठी 7 दिवसांचा अवधी देण्यात आला होता; मात्र त्यातील 4 दिवस सुट्टीचे आहेत; तर उर्वरित 3 दिवसांत येणाऱ्या हरकतींनुसार कारवाई होणार असल्याने सिडकोचा हा सुनियोजित डाव असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. 

ही बातमी वाचली का? वृक्ष कापताना 15 पोपट दगावले

वाशीतील सेक्‍टर 19 येथील ट्रक टर्मिनलच्या जागेत (भूखंड क्रमांक 1) सिडकोचा महागृहनिर्माण प्रकल्प आकार घेणार आहे. या भूखंडावर 103 झाडे असून, ती या प्रकल्पासाठी अडथळा ठरत असल्याने ती तोडण्याची परवानगी अधीक्षक अभियंत्यांनी उद्यान विभागाकडे मागितली आहे. परवानगी देण्यापूर्वी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8 (3) नुसार हरकती मागवण्यात आल्या आहेत. या हरकती लेखी स्वरूपात सिडकोच्या उद्यान विभागाकडे द्यायच्या आहेत. याबाबतची जाहिरात सिडको प्रशासनाने मंगळवारी 18 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली. बुधवारी (ता. 19) शिवजयंती, शुक्रवारी (ता. 21) महाशिवरात्री व त्यांनतर शनिवार (ता. 22) व रविवार (ता. 23) या सुट्ट्या लक्षात घेता गुरुवार (ता. 20), सोमवार (ता. 24) आणि मंगळवार (ता. 25) हे तीनच दिवस लेखी हरकती सादर करण्यास मिळणार आहेत. 

ही बातमी वाचली का? आग लागताच रोबोच तुमच्या दारात...

विकासकामांकरिता पर्यावरणावर घाव घालण्यात सिडको प्रशासन आघाडीवर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. त्यामुळे येथील झाडांचा बळी जाणार, हे निश्‍चित आहे. हरकती मागवण्याचे सिडको केवळ सोंग करत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. झाडांची कत्तल करण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करता येते का ते पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

सिडको प्रशासनाने रचलेला हा कट आहे. 18 तारखेला जाहिरात दिल्यानंतरचे बरेच दिवस हे सुट्टीचे आहेत. तसेच बऱ्याचदा उद्यान विभागामार्फत अशा प्रकारच्या जाहिराती या छोट्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केल्या जातात किंवा एखाद्याच मोठ्या वृत्तपत्रात दिल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाच्याच नजरेत या जाहिराती येतील, असे नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाने हरकती नोंदवण्यासाठी मुदत वाढवून द्यायला हवी. तसेच या जाहिराती सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करायला हव्यात. 
- आबा रणनवरे, पर्यावरणप्रेमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 103 tree cutting for mega housing project in vashi