esakal | आग लागताच 'रोबोट' तुमच्या दारात...
sakal

बोलून बातमी शोधा

आता आग लागताच 'रोबोट' तुमच्या दारात...

अल्प मनुष्यबळ, अर्धवट साहित्य सामुग्री असतानाही आगीशी झुंजणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाला लवकरच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची जोड मिळणार आहे. केमिकल, इंधन व तेलगळतीमुळे लागलेल्या भीषण आगींचा सामना करण्यासाठी रोबोट खरेदी करण्यात येणार आहे.

आग लागताच 'रोबोट' तुमच्या दारात...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : अल्प मनुष्यबळ, अर्धवट साहित्य सामुग्री असतानाही आगीशी झुंजणाऱ्या पालिकेच्या अग्निशमन विभागाला लवकरच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची जोड मिळणार आहे. शहरात दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींमधील आग विझवण्यासाठी आणखीन एक 68 मीटरपर्यंत पोहोचणारी ब्रान्टो लिफ्ट अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. तसेच केमिकल, इंधन व तेलगळतीमुळे लागलेल्या भीषण आगींचा सामना करण्यासाठी रोबोट खरेदी करण्यात येणार आहे. या दोन महत्त्वाच्या बदलांसोबत 60 मीटर उंचीचे एक नवीन टॉवर मॉनिटर वॉटर ब्राऊझर खरेदी केले जाणार आहेत. 

ही बातमी वाचली का? विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी..! लवकरच सुरू होतंय 'हे' केंद्र

शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आग लागत असल्याने स्वरूपानुसार आग विझवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करावा लागतो. सध्या पालिकेमार्फत बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली या चार अग्निशमन केंद्रांच्या माध्यमातून शहराची अग्निसुरक्षा केली जाते; मात्र अग्निशमन विभागाकडे उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी 68 मीटर उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी एकच शिडी असणारी ब्रान्टो लिफ्ट आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन इमारतींना आग लागल्यास पालिकेची पंचाईत होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेता आता अग्निशमन विभागाकडून दुसरी एक 68 मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी शिडी असलेली ब्रान्टो लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. 60 मीटर उंचीपर्यंत जाऊन आग विझवणारे वॉटर ब्राऊझर खरेदी केले जाणार आहे. आग लागलेल्या ठिकाणी तत्काळ पोहचण्यासाठी पंप, जवान व इतर बचाव करण्यासाठी वापरात येणारे साहित्याची ने-आण करण्यासाठी 2 नवीन गाड्या खरेदी केल्या जाणार आहे. तसेच वाशी व ऐरोली भागातील आगीच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेऊन या केंद्रांवर 2 फायर इंजिन वाहने खरेदी केली जाणार आहेत. ही नवीन वाहने खरेदी करण्यासाठी अर्थसंकल्पात 36 कोटी 67 लाख रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे. खाडी व तलावांमध्ये बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जवानांना पाण्याखाली जाऊन बचावकार्य करण्यासाठी प्रशिक्षण व कपडे दिले जाणार आहेत.

ही बातमी वाचली का? महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा 

जवानांना सहाय्यकारी ठरणार 
पालिका क्षेत्रातून एक राष्ट्रीय व एक राज्य महामार्ग जातो. या महामार्गावरून अनेकदा पेट्रोलियम, केमिकल व इंधन वाहून नेले जाते. तसेच शहरातील एमआयडीसीमध्येही अशा ज्वलनशील पदार्थांचा साठा केला जातो. अशा पदार्थांमुळे लागलेली आग जवानांना जीवावर उदार होऊन विझवावी लागते. अशा परिस्थितीत कधीही विस्फोट होण्याची शक्‍यता असते. या आगीशी दोन हात करण्यासाठी रोबोट खरेदी केला जाणार आहे. विस्फोट होऊन, वायू अथवा तेलगळतीने लागलेली आग विझवण्यासाठी या रोबोटचा वापर होणार आहे.