सुलतान वाघासाठी चंद्रपूरहून ११ महिन्यांची वाघीण मुंबईत दाखल

सुलतान वाघासाठी चंद्रपूरहून ११ महिन्यांची वाघीण मुंबईत दाखल

मुंबई: बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील 'व्याघ्र विहारा'मध्ये नव्या वाघिणीची डरकाळी ऐकू येणार आहे. राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक चंद्रपूरहून 11 महिन्यांच्या वाघिणीला घेऊन रविवारी संध्याकाळी मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये दाखल झाले. येथील 'सुलतान' नामक वाघाला जोडीदार म्हणून या वाघिणीला आणण्यात आले आहे. 

बोरिवली नॅशनल पार्कमधील व्याघ्र सफारीला चालना देण्याच्या दृष्टीने नव्या वाघिणीचे आगमन झाले आहे. सद्यस्थितीत येथील व्याघ्र विहारामध्ये 'बिजली' (9), 'मस्तानी' (9) आणि 'लक्ष्मी' (10) या तीन वाघिणींसोबत 'सुलतान' (5) या नर वाघाचा अधिवास आहे. 'सुलतान' या नर वाघाचे 'मस्तानी' आणि 'बिजली' वाघिणींसोबतचे प्रजननाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे उद्यान प्रशासनाने वन विभागाकडे /या माद्यांना जोडीदार म्हणून एक प्रौढ वाघ आणि 'सुलतान'साठी वाघीण देण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूरहून 11 महिन्यांच्या वाघिणीला मुंबईला आणण्यात आले.

बोरिवली राष्ट्रीय उद्यानाचे पथक या वाघिणीला घेऊन शुक्रवारी दुपारी मुंबईच्या दिशेने निघाले. अडीच दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी संध्याकाळी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याची माहिती उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली. ही मादी लहान असल्याने तिला व्याघ्र सफारीत ठेवले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ती प्रजननक्षम झाल्यानंतरच 'सुलतान'सोबत तिचे प्रजनन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एप्रिल महिन्यात चंद्रपूरमधील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील सुशी डाबगावमध्ये एक गोठ्याशेजारी ही वाघीण बेवारस अवस्थेत वन कर्मचाऱ्यांना सापडली होती. त्यावेळी तिचे वय अंदाजे तीन महिने होते. या मादी पिल्लांच्या संरक्षणार्थ वन कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तीन दिवस या पिल्लाला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. भारतात पहिल्यांदा प्रयत्न करुन गुणसूत्र (डीएनए) चाचणीच्या आधारे देखील या पिल्लांची आई शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यामध्येही यश न मिळाल्याने सरतेशेवटी या पिल्लाची रवानगी 'वन्यजीव निवारा केंद्रा'मध्ये करण्यात आली. तेव्हापासून ही वाघीण चंद्रपूरच्या 'वन्यजीव निवारा केंद्रा'त होती.

सध्या या वाघिणीचे वय 11 महिने आहे. प्रजननक्षम होण्यासाठी तिचे वय किमान अडीच वर्षे होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच सुलतान वाघाबरोबर तिचे प्रजनन होऊ शकते. सध्या या वाघिणीस व्याघ्रवहारातील पिंजऱ्यातील सुविधांमध्ये ठेवण्यात येईल. मात्र व्याघ्र विहारात पर्यटकांना तिचे दर्शन मिळण्याची शक्यता इतक्यात नसल्याचे, मल्लिकार्जुन यांनी नमूद केले. मुख्य वनसंरक्षकांच्या परवानगीनंतरच त्यावर निर्णय होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

11 month old tiger from Chandrapur arrives in Mumbai for Sultan tiger

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com