दिवाळीनंतर तब्बल १२ हजार कोरोना रुग्णांची भर, मृत्यू नियंत्रणात

दिवाळीनंतर तब्बल १२ हजार कोरोना रुग्णांची भर, मृत्यू नियंत्रणात

मुंबई:  दिवाळीनंतर मृत्यू संख्या नियंत्रणात असली तरी रूग्ण संख्या वाढताना दिसते. दिवाळी नंतरच्या पाच दिवसांत मुंबईत पाच हजाराहून अधिक रूग्णांची भर पडली आहे. गेल्या 15 दिवसांत 12,655 रूग्णांची भर पडली आहे.  कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.  मात्र दिवाळीनंतर कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्याने रूग्णांची संख्या काहीशी वाढल्याचे दिसत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. 

मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने त्यावर नियंत्रण मिळवत लोकांना दिलासा दिला होता. त्यानंतर दिवाळी उत्सव येऊन ठेपला. त्यातच काही दिवस थंडीची लाट देखील आल्याने कोरोनाच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसते. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना सावध राहण्याचा इशाराही दिला.

दिवाळी उत्सव सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजे 7 नोव्हेंबरला दिवसभरात 576 नवे रूग्ण आढळले होते. मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ही 2 लाख 63 हजार 052 इतकी होती. दिवसभरात 23 मृत्यू झाले होते तर एकूण मृत्यू्ंची संख्या ही 10,419 इतकी झाली होती. त्यानंतर 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी उत्सव साजरा झाला. त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी दिवसभरात 1,135 नवे रूग्ण आढळले. 19 जणांचा मृत्यू झाला. रूग्णांची एकूण संख्या ही 2 लाख 75 हजार 707 इतकी झाली. मृतांचा एकूण आकडा हा 10,673 इतका झाला. 

7 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या 15 दिवसांत 12,655 बाधित रूग्ण वाढले. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची सरसरी संख्या ही 500 वरून 1 हजारच्या वर गेली आहे. रूग्णाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे दिसते. मृत्यूची सरासरी संख्या ही 20 च्या दरम्यान असून गेल्या 15 दिवसात 254 मृत्यू झाले. यातील 80 टक्के मृत्यू हे 60 वर्षावरील आणि दीर्घकालिन आजारी असणा-या व्यक्तींचे झाले आहेत. रूग्ण वाढत असल्याने मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या देखील 502 वरून 365 पर्यंत वाढली.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने पालिकेनं ही लाट थोपवण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी पालिका प्रशासन घेत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने दिवाळीनंतर चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्याशिवाय प्रत्येक विभागात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले असून नागरिकांसाठी मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात कोरोना चाचणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तेथे सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेची चिन्ह अद्याप दिसलेली नाहीत. मात्र लाट आलीच तर या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन तयार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून धारावी सारख्या परिसरात आरोग्य शिबीरं सुरू करण्यात आली आहेत. कोविड केंद्र तसेच पालिकेच्या मुख्य रूग्णालयात खाटा तसेच आयसीयू, ऑक्सिजन खाटांची सुविधा तयार असून खासगी रूग्णालयातील आरक्षित खाटा देखील अजून काही महिने पालिकेच्या ताब्यात ठेवणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

12 thousand more corona patients after Diwali death under control

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com