कोरोनाकाळात मुंबईकरांची डोकेदुखी वाढली, बुधवारपासून २० टक्के पाणीकपात जाहीर...

समीर सुर्वे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 34 टक्के पाणीसाठा जमा असल्याने येत्या बुधवारपासून म्हणजेच पाच तारखेपासून 20 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 34 टक्के पाणीसाठा जमा असल्याने येत्या बुधवारपासून म्हणजेच पाच तारखेपासून 20 टक्के पाणी कपात लागू होणार आहे. मुंबईला 750 दशलक्ष लिटर पाण्याचा कमी पुरवठा होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातून ड्रोज 3950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यातील 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणी मुंबईला पुरवले जाते. या सर्व पाणी पुरवठ्यात कपात होणार असून मुंबईला 750 दशलक्ष लिटर कमी पाणी मिळणार आहे. तर ठाणे शहरासह भिवंडी भागातील ज्या भागात पालिकेकडून पाणी पुरवठा होतो त्या भागांनाही 20 टक्के कमी पाणी मिळणार आहे.

मोठी बातमी - देवनार पशुवधगृहात आजपासून धार्मिक कत्तलीला परवानगी

२०२० च्‍या पावसाळ्यामध्‍ये जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्‍यवृष्‍टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात मुंबईतीला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्‍ये फक्‍त सुमारे 34.49 टक्‍के जलसाठा उपलब्‍ध आहे. सदर जलसाठा जुलै 2019 मध्‍ये 85.68 टक्‍के आणि जुलै 2018 मध्‍ये 83.30 टक्‍के होता. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्‍यास पावसाळा संपल्‍यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्‍ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा 31 जुलै 2012 पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागामार्फत सांगण्यात आले.

मोठी बातमी - 5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

 जपून वापरा पाणी

 • पाणी पिण्‍यासाठी लहान आकाराचे पेले (ग्‍लास) वापरा 
 • अनेक जणांना पाणी देताना जुन्‍या पद्धतीप्रमाणे तांब्या आणि पेल्‍याने पाणी द्या !
 • वाहने न धुता ओल्‍या फडक्‍याने पुसून घ्‍या !
 • घरातील इतर कामे करत असताना नळ बंद ठेवा 
 • गळके नळ, जलवाहिन्‍या त्‍वरित दुरुस्‍त करुन घ्‍या 
 • दाढी करताना, दात घासताना पाण्‍याचा नळ बंद ठेवा 
 • वाहत्‍या नळाखाली कपडे-भांडी धुऊ नका 
 • आंघोळ करताना शॉवर सतत सुरु ठेवू नका 
 • नळाखाली बादली भरत ठेवून पाणी वाहू देऊ नका 
 • आदल्‍या दिवशीचे पाणी शिळे समजून फेकू नका 
 • नळ पूर्ण उघडू नका 
 • गॅलरी, व्‍हरांडा व लादी धुण्‍याऐवजी ओल्‍या फडक्‍याने पुसून घ्‍या 
 • झाडांसाठी गरजेपेक्षा जास्‍त पाण्‍याचा वापर करु नका 
 • वर्षा संचयन व विन‍ियोगाच्‍या पद्धतींचा वापर करा 
 • पाण्‍याच्‍या टाक्‍या वाहू देवू नका. त्‍यांना बॉलकॉक बसवा

मोठी बातमी - दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद 

पाणीसाठा 

 • 2020- 4 लाख 99 हजार 199
 • 2019--12 लाख 40 हजार 122
 • 2018-- 12लाख 05 हजार 596

तलावातील पाणीपातळी (मिटर)  पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

 • तलाव -- पुर्ण पातळी -- आजची पातळी -- साठा 
 • अप्पर वैतरणा -- 603.51-- 597.08 -- 39375
 • मोडकसागर --163.15 -- 152.81 -- 51866
 • तानसा -- 128.63 -- 122.00 -- 37283 
 • मध्य वैतरणा -- 285 -- 259.83 -- 66252
 • भातसा -- 142.07 -- 123.00 -- 277351
 • विहार -- 80.12 -- 78.45 -- 19026
 • तुळशी -- 139.12 --139.26 -- 8040

( संपादन - सुमित बागुल )

20 percent water cut declared in mumbai due to lack of rainfall


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 percent water cut declared in mumbai due to lack of rainfall