पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी 24 हजार कोटींचा निधी मंजूर

प्रकाश पाटील
Thursday, 8 October 2020

सातपाटी मुरबे येथील मच्छीमारांच्या बोटी उभ्या करण्यासाठी मच्छिमारी बंदर, तसेच जलवाहतूक ही व्यवस्था या बंदरातून केली जाणार आहे.

पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी 24 हजार कोटींचा निधी केंद्रद्वारे मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंबंधी एक प्रस्ताव केंद्रीय राज्य मंत्र्याकडे सादर केला होता. निर्मल सागर तट समृद्धी योजनेअंतर्गत सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने 24 हजार कोटींच्या विविध कामांना मंजुरी दिल्याचे खासदार गावित यांच्याकडून सांगण्यात आले. 

महत्त्वाची बातमी : फेक TRP स्कॅम : अर्णब गोस्वामी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना कोर्टात खेचणार

विकासकामांमध्ये पालघर जिल्ह्यात 42 कामांचा समावेश आहे. सातपाटी मुरबे येथील मच्छीमारांच्या बोटी उभ्या करण्यासाठी मच्छिमारी बंदर, तसेच जलवाहतूक ही व्यवस्था या बंदरातून केली जाणार आहे, अशी माहिती देखील खासदार गावित यांनी "सकाळ'ला दिली. तसेच अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्काय वॉक उभारला जाणार असून एक मच्छी मार्केट उभारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. किनारा पर्यटन अंतर्गत एडवण, कोरे, केळवे, चिंचणी, वाणगाव, नवापूर आणि बोर्डी आदी भागांमध्ये अनेक सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत, असे गावित यांनी सांगितले. वाढवण बंदराला आपला विरोधच आहे. केंद्र आणि राज्य सरकारसह जेएनपीटी अदानी यांसारख्या उद्योगपतीला वाढवण बंदरासाठी प्राधान्य देत असेल तर हा देशाला सर्वात मोठा धोका असल्याचे प्रतिपादन खासदार गावित यांनी केले. 

महत्त्वाची बातमी : मुंबई पोलिसांचा सनसनाटी खुलासा, उध्वस्त केलं चॅनल्सचं 'फेक TRP रॅकेट', रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी

वाढवण बंदराला विरोध 
केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करताना आपण याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले. डहाणूचे थर्मल पावर स्टेशन उद्योगपती अंबानीकडून अदानी यांनी विकत घेतले. केंद्र व राज्य सरकार आणि जेएनपीटीच्या भागीदारीतून उभे राहणारे वाढवण बंदर अदानी यांसारख्या अविश्‍वसनीय उद्योगपतीला देण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर यांसारखे छोटे उद्योगधंदे हे वाढवण बंदराच्या उभारणीमुळे उद्धवस्त होणार असल्याचे माझा या बंदराला पूर्ण विरोध राहणार असल्याचे राज्यमंत्र्यांना कळवले असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले. 

मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मच्छिमार बंदरे, जेटी व इतर विकास कामाचे प्रस्ताव केंद्र सरकार कडे दिले होते. त्यावर चर्चा होऊन केंद्र सरकारने या विकास कामासाठी 24 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. 
- खासदार, राजेंद्र गावित 

(संपादन : वैभव गाटे)

24000 crore sanctioned for development of Palghar district


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24000 crore sanctioned for development of Palghar district