रायगडात 35 भातखरेदी केंद्रे; आधारभूत किमतीत केवळ 53 रुपयाने वाढ 

महेंद्र दुसार
Saturday, 24 October 2020

कोरोनामध्ये शेतीच्या मजुरीचे दर वाढले आहेत. अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे यंदा भाताच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांची होती; मात्र केवळ प्रतिक्विंटल 1 हजार 868 रुपये हमीभावात समाधान मानावे लागणार आहे.

अलिबाग : राज्य सरकारने भातखरेदीसाठी रायगड जिल्ह्यात 35 केंद्रांना मंजुरी दिली आहे; तर सर्वसाधारण भाताला 1 हजार 868 रुपये 
प्रतिक्विंटल हा भाव जाहीर केला आहे. मागील वर्षापेक्षा आधारभूत भात किंमतीत केवळ 53 रुपये वाढ केली आहे. वाढत्या महागाईमध्ये हा भाव तुटपुंजा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मस्त बातमी : नागपूरची संत्री मोठ्या प्रमाणात एपीएमसीमध्ये दाखल 

कोरोनामध्ये शेतीच्या मजुरीचे दर वाढले आहेत. अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे यंदा भाताच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांची होती; मात्र केवळ प्रतिक्विंटल 1 हजार 868 रुपये हमीभावात समाधान मानावे लागणार आहे; तर "अे' ग्रेडच्या भातासाठी रुपये 1 हजार 888 प्रतिक्विंटल किंमत मिळणार आहे. त्यामुळे दिलासा देण्यासाठी वेळेत बोनस देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सरकारने अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, श्रीवर्धन, माणगाव, महाड या तालुक्‍यातील 35 भातखरेदी सुरू करण्याचे घोषित केले आहे. 

हे वाचा : मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर

खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येकाने आपल्यासोबत आधार कार्ड आणि बॅंकेच्या पासबुकाची छायांकित प्रत आणणे आवश्‍यक आहे. खरेदी केलेल्या भाताची रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. 

भाताच्या आर्द्रतेसाठी 17 टक्के प्रमाण सरकारने ठरवून दिले आहे. यापेक्षा जास्त आर्द्रतेचे प्रमाण असल्यास भात विकता येणार नाही. भातखरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना खरेदी केंद्रांना देण्यात आल्या आहेत. 
- के. टी. ताटे, जिल्हा पणन अधिकारी 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धान्य भिजलेले असल्याने आर्द्रतेचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान्य विकले जाणार नाही. यावर दिलासा देण्यासाठी शासनाने 500 रुपये प्रतिक्विंटल या हिशेबाने निदान बोनस तरी वेळेत द्यावा. 
- गणेश भगत, सरचिटणीस, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 shopping centers in Raigad district; Only Rs 53 increase in base price