मायानगरीतील मृत्यूमध्ये 37 टक्क्यांची वाढ; गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा आकडा

मिलिंद तांबे
Wednesday, 9 September 2020

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृत्यूमध्ये तब्बल 37 टक्के वाढ झाली आहे.

मुंबई  : मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृत्यूमध्ये तब्बल 37 टक्के वाढ झाली आहे. 1 मार्च ते 31 जुलै दरम्याम मुंबईत 49,040 मृत्यूंची नोंद झाली. गेल्या वर्षी याच दरम्यान 35,982 मृत्यूंची नोंद झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 13,058 मृत्यू अधिक झाले आहेत. 

बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

गेल्या वर्षी मे महिन्यात 6,832 रूग्णांचा मृत्यू झाला होता. यावर्षी मेमध्ये 14,085 मृत्यू झाले आहेत. तर, गेल्यावर्षी जूनमध्ये 6,797 मृत्यू झाले होते. यावर्षी हा आकडा 11,540 वर पोहोचला आहे. कोरोना बाधितांची संख्या मे महिन्यात सर्वाधिक होती. याच महिन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या दशकातील सर्वाधिक मृत्यू मे महिन्यात नोंदवले गेले आहेत. जुन्या मृत्यूंची नोंद अद्याप बाकी असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
मार्च महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात 7,358 मृत्यू झाले तर, यावर्षी 6,692 मृत्यू झाले. एप्रिलपासून मृत्यूंची संख्या सतत वाढत आहे. एप्रिलमध्ये 7243 असणारी मृत्यूंची संख्या मेमध्ये 14,085 झाली. जून मध्ये 11,540 तर जुलैमध्ये 9,480 इतकी मृत्यूंची नोंद झाली.

  नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर; आयुक्तांना दिले निवेदन

यावर्षी कोरोनामुळे मुंबई बाहेरील 40 टक्के रूग्णांवर शहरावर उपचार करण्यात आले. त्यातील काही रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. ठाणे, नवी मुंबई तसेच पालघरमधील  अनेक रूग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्या मृत्यूचा दाखलाही पालिकेतून देण्यात आला, असे काकाणी यांनी सांगितले. 

सर्वाधिक बळी कोरोनामुळे
यावर्षी नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना संसर्ग हे महत्वाचे कारण आहे. त्यातुलनेत रेल्वे किंवा रस्ते अपघातात कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. यावर्षी केवळ 260 रेल्वे अपघातात मृत्यू झाले आहेत.  गेल्या वर्षी 1 मार्च ते 31 जुलैदरम्यान रेल्वे अपघातात 1068  मृत्यूंची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान 144 रस्ते अपघातांची नोंद झाली. गेल्या वर्षी 264 मृत्यू झाले होते.
 

मृत्यूंचा आकडा नेमका कशामुळे वाढला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, कोरोना काळात आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने नॉन कोव्हिड मृत्यू वाढले असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक अभ्यास सुरू आहे. 
डाॅ. मंगला गोमारे,
मुख्य वैद्यकिय अधिकारी, पालिका

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 per cent increase in deaths in Mumbai; The biggest figure in the last ten years

फोटो गॅलरी