बापरे! भिवंडीतल्या महिलेच्या पोटातून काढल्या पाच किलो वजनांच्या तब्बल 45 गाठी

बापरे! भिवंडीतल्या महिलेच्या पोटातून काढल्या पाच किलो वजनांच्या तब्बल 45 गाठी

मुंबई: पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी जेजे रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटातून तब्बल 45 गाठी काढण्यात आल्या. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या महिलेला नवीन जीवन मिळाले असून या गाठी फायब्रोईडच्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कोरोना काळात भिवंडीतील शमा नौशाद अन्सारी (वय 43) यांनी आपला आजार अंगावर काढावा लागला, त्यातूनच परिस्थिती गंभीर बनली. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या पोटामध्ये वाढत असलेल्या ट्यूमरमुळे तीला प्रचंड वेदना होत होत्या. त्यानंतर शमा यांना अनेक रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र कोरोनाचे कारण देत काही रुग्णालयांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी नकार दिला. शेवटी त्यांनी जेजे रुग्णालय गाठले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेच्या पोटातून पाच किलो वजनांच्या 45 गाठी काढल्या.

महिलांमधील हार्मोन्समध्ये बदल झाल्यावर किंवा अनुवांशिकपणे त्यांच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉईडचा ट्यूमर निर्माण होण्याची शक्यता असते. शमा 2007 मध्ये गर्भवती असताना तिच्या सोनोग्राफी अहवालामध्ये गर्भाशयात फायब्रॉईडच्या गाठी दिसून आल्या. पोटातील बाळाबरोबरच गाठीही वाढू लागल्या. शमाची प्रसूती सुरळीत झाल्यावर गाठी काढण्याबाबत तिचे पती नौशाद अन्सारी यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली.

त्यावर शमा यांची मासिक पाळी बंद झाल्यावर गाठी काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अन्सारी यांनी पुढील उपचार सुरू ठेवले, मात्र शमाच्या पोटातील वेदना कायम होत्या. तब्बल 13 वर्षे शमा हा त्रास सहन करत होत्या. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना प्रचंड त्रास होऊ लागल्याने त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना 30 एप्रिलला शस्त्रक्रिया करू असे सांगत 28 एप्रिलला दाखल होण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, अशाही परिस्थितीत अन्सारी यांनी स्वत:च्या जीवाची परवा न करता पोटातील वेदनेसह शमाला 28 एप्रिलला मोटरसायकलवरून भिवंडीहून ठाण्याला आणले.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे उपस्थित डॉक्टरांनी सध्या शस्त्रक्रिया बंद असल्याचे सांगत त्यांना दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अनेक रुग्णालयांमध्ये धाव घेतली. मात्र कोणीच शस्त्रक्रियेची तयारी दर्शवली नाही. काही दिवसांनी अन्सारी यांनी पुन्हा ठाणे रुग्णालय गाठले. त्यावेळीही त्यांना डॉक्टर उपलब्ध नसून मुंबईतील केईएम, सायन किंवा जे.जे. रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अन्सारी यांनी शमाला घेऊन जे.जे. रुग्णालय गाठले.

शमा जे.जे. रुग्णालयात आल्यानंतर स्त्रीरोगशास्त्र प्रसूती विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. राजश्री कटके यांनी तातडीने त्यांची सोनोग्राफी, कोविड आणि अन्य चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये शमाच्या पोटामध्ये भला मोठा ट्यूमर असल्याचे आढळले. प्रथमदर्शनी हा ट्यूमर कर्करोगाचा वाटल्याने त्यांनी शमाचे सीटी स्कॅन केले. त्यानंतर तो ट्यूमर फायब्रॉईडच्या गाठींचा असल्याचे स्पष्ट झाले. ट्यूमर हृदयापर्यंत पोहोचला होता, तसेच मूत्राशयाच्या नळ्या आणि पोटातील आतडी 50 टक्के दबली होती. शस्त्रक्रिया करण्यास विलंब झाल्यास मूत्राशय, आतड्यांना मोठी इजा होऊन जीवावर बेतण्याची शक्यता होती. शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. राजश्री कटके यांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. 

किचकट आणि अवघड असलेल्या या शस्त्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त जाण्याची शक्यता असते. मात्र डॉ. राजश्री कटके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शमाच्या मूत्राशयाच्या नळीमध्ये तारा टाकून फ्रोजन सेक्शन पद्धतीचा वापर करत यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल सहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये शरीरातून रक्त न घालवता तब्बल पाच किलो वजनाचा ट्यूमर काढला. त्यामध्ये तब्बल लहान-मोठ्या 45 फायब्रॉईडच्या गाठी होत्या. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शमाला एक नवीन जीवन मिळाले आहे.
 
शमाच्या पोटातील ट्यूमर हा तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. पण यापूर्वी अशा अनेक किचकट शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करू शकले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माझे सहकारी डॉक्टर, परिचारिका यांची मोलाची साथ लाभली. या शस्त्रक्रियेमुळे शमाचे कुटुंबीय आनंदी झाले. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
डॉ. राजश्री कटके, विभाग प्रमुख, स्त्रीरोग शास्त्र प्रसुती विभाग, जे.जे. रुग्णालय

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

45 lumps removed from abdomen woman JJ Hospital treatment stomach ailments

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com