esakal | मुरूडमध्ये ढगफुटी सात तासांत ४७५ मिमी पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूडमध्ये ढगफुटी सात तासांत ४७५ मिमी पाऊस

मुरूडमध्ये ढगफुटी सात तासांत ४७५ मिमी पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : मुरूड तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. अवघ्या सात तासांत तब्बल ४७५ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून २५ गावांमधील सुमारे दीड हजार नागरिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसला.

हेही वाचा: Malad : अनधिकृत मासेमारीला पायबंद बसणार

सोमवारी रात्री १० वाजल्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस मंगळवारी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होता. याचदरम्यान समुद्राला भरती आल्याने अनेक भागांत पाणी साचले. बोर्ली मांडला, नांदगाव येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उसरोली-सुपेगाव, म्हाळुंगे-बारवाई, भोईघर-बेलवाडी या मार्गावरील पूल नादुरुस्त झाल्याने हे मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने अनेकांच्या घरांतील साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुरूडबरोबरच श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांतही जोरदार पाऊस बरसला. श्रीवर्धन येथे १५३ मिमी; तर म्हसळ्यात १०५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरला असला, तरी दिवसभर रिपरिप सुरू असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत असल्याचे मुरूडचे प्रभारी तहसीलदार गोविंद वाकडे यांनी सांगितले.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

चिखली पुलाला धोका
अलिबाग-मुरूड मार्गावरील चिखली गावाजवळील पूल एका बाजूला खचला आहे. या पुलाची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. सर्वे परिसरात रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला होता. पाण्याला वेगही जास्त होता, या वेगाने पुलाची एक बाजू खचली आहे. या ठिकाणी अवजड वाहतुकीला बंदी असल्याचा फलक लावण्यात आला आहे.

साळाव येथे दरड कोसळली
चार वर्षांपूर्वी साळाव चेकपोस्टजवळ दरड कोसळली होती. याच ठिकाणी सोमवारी रात्री पुन्हा दरड कोसळल्याने मुरूडकडे जाणारा मार्ग बंद पडला. प्रशासनाने रात्रीतूनच जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला केली आणि पहाटे ५ वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

''अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पाणी शिरले असून चिखली, विहुर, सुपेगाव, उसरोली येथील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने यामध्ये कुणाचीही जीवितहानी झालेली नाही.''
- रवींद्र सानप, निवासी नायब तहसीलदार, मुरूड

loading image
go to top