शाळा की कोंडवाडा?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

कर्जत तालुक्‍यातील कळंब गावात असलेली भागूची वाडी शाळेची दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने विद्यार्थ्यांना बसवणेही धोक्‍याचे झाले आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात अध्ययन करावे लागत असल्याने ग्रामस्थ शाळेसाठी नवीन इमारतीची मागणी करत आहे.

कर्जत (बातमीदार) : कर्जत तालुक्‍यातील कळंब गावात असलेली भागूची वाडी शाळेची दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने विद्यार्थ्यांना बसवणेही धोक्‍याचे झाले आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात अध्ययन करावे लागत असल्याने ग्रामस्थ शाळेसाठी नवीन इमारतीची मागणी करत आहे.

कर्जत तालुक्‍यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ भागात वसलेल्या भागूची वाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दोन इमारतींपैकी एक इमारत धोकादायक झाल्याने पालकांनी इमारतीस टाळे लावले आहे. १०० टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, इमारतीच्या भिंतीला तडे आणि प्लास्टर निखळले आहे. त्याचबरोबर छताचीही अवस्था बिकट आहे. त्यामुळे दुसऱ्या एक वर्गखोलीच्या इमारतीत पहिली ते पाचवीपर्यंत एकूण ४८ विद्यार्थ्यांना दाटीवाटीत बसवून अध्ययन करावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

फार्महाऊसधारकांना प्रवेशबंदी करा... कुठे ते वाचा

खेदाची बाब म्हणजे, तीन वर्षांपासून हे विद्यार्थी एकाच छोट्याशा वर्गात अध्ययन करत आहेत. पाचही वर्गाला एकाच ठिकाणी बसवावे लागत असल्याने शिक्षकांनाही शिकवणे गैरसोईचे झाले आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिकणेही अवघड झाले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. वारंवार मागणी करूनही या शाळेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पालकवर्ग संतप्त झाले असून, तातडीने नवीन वर्गखोली बांधण्याची मागणी करत आहेत. 

हेही वाचा... पोलिसांवर त्‍यांची दबंगगिरी... हल्ला करून झाले फरार

तीन वर्षे होत आली, तरी आमच्या मुलांना एका लहान वर्गखोलीत दाटीवाटीने कोंबून बसवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. परिणामी, त्यांची शैक्षणिक प्रगती मंदावली आहे. आमच्या या दुर्गम आदिवासी भागातील शाळेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारला विनंती आहे की, आमच्या शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी.
- रेवती लहू ढोले, माजी सरपंच, महिला अध्यक्ष, 
आदिवासी संघटना कर्जत

आमच्या वाडीत पाचवीपर्यंतची शाळा आहे. तीन वर्षे झाले शाळेची दुरवस्था झाली आहे. भिंतींना तडे गेल्याने धोकादायक झाली आहे. त्यामुळे आम्ही मुलांना त्या खोलीत बसवणे बंद केले असून, वर्गास टाळे लावले आहे. तीन वर्षांपासून एकाच वर्गात मुलांना बसवले जाते. त्यामुळे लवकरात लवकर शाळेला नवीन इमारत बांधण्यात यावी. 
- बुधाजी निरगुडा, पालक

अाणखी काही वाचा... गड-किल्ल्‍यांमध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी

भागूची वाडी शाळेत जिल्हाअंतर्गत बदलीने ३ मे २०१९ रोजी रूजू झालो. त्या वेळी माझ्या निदर्शनास आले की, शाळेच्या दोन वर्गखोल्यांपैकी एक वर्गखोली असलेली इमारत पूर्णत : नादुरुस्त आहे. भिंतीला तडे गेले आहेत. छप्पर पूर्णतः खराब झाले आहे. प्लास्टर निखळले आहे. त्यामुळे त्या खोलीत विद्यार्थी बसवले जात नाहीत. विद्यार्थ्याची गैरसोय पाहता १७ जून २०१९ मध्ये वर्गखोलीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीला सादर केला आहे.
- हरीचंद्र आवारे, मुख्याध्यापक, भागूची वाडी शाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Divisions in One Small Classroom