एसटी कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक सेवेत कसूर सुरूच, निलंबनाच्या आदेशाचा परिणाम नाहीच

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 एप्रिल 2020

एसटी महामंडळाने अत्यावश्‍यक सेवेतील गैरहजर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश शुक्रवारी दिला होता. परंतु, शनिवारी सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे आढळले. घरी बसलेले कर्मचारी कामावर जाणाऱ्यांचे मनोबल खच्ची करत असल्याने एसटी सेवा कोलमडण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : एसटी महामंडळाने अत्यावश्‍यक सेवेतील गैरहजर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश शुक्रवारी दिला होता. परंतु, शनिवारी सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे आढळले. घरी बसलेले कर्मचारी कामावर जाणाऱ्यांचे मनोबल खच्ची करत असल्याने एसटी सेवा कोलमडण्याची शक्‍यता आहे. 

मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर अडचण नाही, ठाकरे सरकार पडणार नाही; कसं ?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवस लॉकडाऊन आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरांत अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने 600 बसगाड्यांचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील एसटी आगारांमधील सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिले होते. तथापि, काही दिवसांत अत्यावश्‍यक सेवेतील फक्त 30 टक्के कर्मचारी हजर असल्याचे आढळले. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला होता.

मोठी बातमी - "हा संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स आधी सुटेल तो हरेल..." - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या परिपत्रकाला एसटी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. नियोजन केलेल्यांपैकी मोजके कर्मचारी कामावर येत आहेत. शनिवारी तर फक्त 50 टक्के कर्मचारी कामावर हजर असल्याचे समजते. त्यामुळे बसगाड्यांच्या फेऱ्या कमी होत आहेत. परिणामी अत्यावश्‍यक सेवांतील कर्मचाऱ्यांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर एसटी बसमधील प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता वाढली आहे. दरम्यान, घरात बसलेले कर्मचारी कामावर जाणाऱ्यांचे मनोधैर्य खचवण्याचे काम करत असल्याचे सांगितले जाते. 

कामावर येण्याचे आदेश दिल्यानंतर बहुतेक एसटी कर्मचारी हजर झाले आहेत. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. आणखी काही कर्मचारी कामावर येतील. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा देण्यात एसटी कर्मचारी कमी पडणार नाहीत. 
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50% employees of ST absent