कोरोनानंतर उद्भवलेल्या फुप्फुसाच्या फायब्रोसिवर 57 वर्षीय रुग्णाची यशस्वी मात

भाग्यश्री भुवड
Saturday, 5 September 2020

मुंबईतील 57 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णामध्ये फुफ्फुसाच्या फायब्रोसिसची गंभीर समस्या आढळून आली. यावेळी चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोनाचे संकट असतानाही केवळ रुग्णाचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने योग्य ते उपचार करून या रूग्णाला नव्याने जीवदान दिले आहे.

मुंबई: कोरोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांना पोहोचते. फुफ्फुसातील उती डेमेज होतात. ज्याचा परिणाम म्हणून व्यक्ती योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. ज्या रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवले आहे आणि ज्या रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे अशा रुग्णामध्ये फाइब्रोसिस (fibrosis) ची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

मुंबईतील 57 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णामध्ये फुफ्फुसाच्या फायब्रोसिसची गंभीर समस्या आढळून आली. यावेळी चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोनाचे संकट असतानाही केवळ रुग्णाचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने योग्य ते उपचार करून या रूग्णाला नव्याने जीवदान दिले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या रूग्णाला ऑक्सिजन थेरपी, स्टिरॉइड्स, पिरफेनिडोन, फिजिओथेरपी आदी उपचार देण्यात आले आहे.

वैद्यकीय भाषेत पोस्ट इन्फेकशन फायब्रोसिस म्हणजे कोविड संसर्गानंतर फुफ्फुसांना झालेली इजा. अशा विषाणूच्या संसर्गामुळे उपचारानंतरही काही वेळा फुफ्फुसातील जखम बरी झाल्यानंतरही त्याचवरचे व्रण कायम राहतात. त्यावेळी थोडया फार प्रमाणात फुफ्फुसाची कार्यशक्ती मंदावते. मग अशावेळी रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अशा स्थितीत रूग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करणं गरजेचं असतं.

हेही वाचाः  मुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट

चेंबूरचा रहिवासी श्रावण ओबेरॉय (नाव बदलले आहे) यांना एप्रिल महिन्यात श्वासोच्छवासाचा त्रास झाला. त्यांनी एका स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. तब्येत खूपच खालावल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्या दिशेने उपचारास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा कोविड चाचणी करण्यात आली आणि ती चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर हा रुग्ण कोविड निगेटिव्ह असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णाला फुफ्फुसाच्या फायब्रोसिसचे निदान झाले. फुफ्फुस विकार तज्ञ डॉ. अरविंद काटे आणि त्यांच्या टीमनं या रुग्णावर पुढील उपचारासाठी सुरुवात केली.

अधिक वाचाः  मुंबई पालिकेतल्या १३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयाचे फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले की, ' रुग्ण 12 दिवसांसाठी आयसीयूमध्ये होता आणि त्यानंतर काही काही आठवड्यातच त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. रुग्णालयातून घरी सोडताना रुग्णाची ऑक्सिजन पातळी 93 टक्के होती. काही लोकांच्या फुफ्फुसांवर जास्त प्रमाणात व्रण असतील आणि काही भाग निकामी झाला असेल तर त्यांना ऑक्सिजन मशीनचा वापर घरी देखील करावा लागतो.

(संपादनः पूजा विचारे)

57 year old patient successfully beat pulmonary fibrosis arising after corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 year old patient successfully beat pulmonary fibrosis arising after corona