ठाण्यातील साहित्य रसिकांना अनोखी पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यातील साहित्य रसिकांना अनोखी पर्वणी

ठाणे : लाल सेना संघटनेतर्फे दरवर्षी होणारे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन यंदा प्रथमच ठाणे शहरात आयोजित केले जाणार आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी हे संमेलन घेण्याचे निश्चित झाले असून ठाण्यातील साहित्य रसिकांसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे. १८ व्या अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील कवयित्री आणि लेखिका छाया कोरेगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन हे यापूर्वी परभणी, नाशिक आदी ठिकाणी पार पडले होते. कोरोना काळात संमेलनाच्या आयोजनावर निर्बंध आल्यामुळे मागील दोन वर्षे हे विचार साहित्य संमेलन होऊ शकले नाही. ठाण्यात होणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनाला राज्यातील अनेक नामवंत लेखक, साहित्यिक उपस्थित राहणार असून ठाणेकरांना विद्रोही साहित्यिकांचे विचार ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. अण्णा भाऊ साठेंनी समाजातील दलित, कष्टकरी, कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. तेव्हा त्यांच्या विचारांवर हे संमेलन होणार असून, यात सध्याच्या शेतकरी कायदा आणि कामगारांविषयीच्या ज्वलंत विषयांवर चर्चा केली जाणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील अनेक कार्यकर्तेही संमेलनाला उपस्थिती लावणार आहेत.

हेही वाचा: भारत-न्यूझीलंड मालिकेसाठी प्रेक्षकांची मैदानात उपस्थिती ?

१८ व्या अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाची बैठक २७ ऑक्टोबरला पार पडली. या सभेत लाल सेना नेते कॉ. गणपत भिसे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष कामगार नेते कॉ. एम. ए. पाटील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सुबोध मोरे, स्वागत समिती सदस्य व कामगार नेते जगदीश खैरलिया, ॲड. नाना अहिरे, सुबोध शाक्यरत्न, नाटककार संदेश गायकवाड, रंगा अडागळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, सुनील कदम, लाल सेनेचे विजय क्षीरसागर, हेमंत साळवे, शिवाजी जाधव, राजू आगळे, बाबूराव बनसोडे, धोंडीराम खराटे आदी स्वागत समिती सदस्य उपस्थित होते.

loading image
go to top